अमरावती : राज्यातील विविध भागात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामावर मोठे संकट आले आहे. आधीच खरीप हंगामात नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे. शेतात साचलेले पाणी मुरत नसल्याने त्याचा परिणाम रब्बीच्या पेरण्यांवर होणार आहे.
राज्यात साधारण सप्टेंबर महिन्यापासूनच रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात होते. काही भागांत ऑगस्ट महिन्यातच रब्बी ज्वारी पेरली जाते. यंदा ऑक्टोबर संपूनही बहुतांश भागात रब्बीच्या पेरण्यांना मुहूर्त लागलेला नाही. राज्यात रब्बी पिकाखालील एकूण पेरणीचे सरासरी क्षेत्र हे ५७ लाख ८० हजार ४१७ हेक्टर आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार २८ ऑक्टोबरपर्यंत केवळ ३५ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी झाली होती. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत ३.५३ लाख हेक्टरमध्ये पेरा झाला होता.
सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड होते. ज्वारीची पेरणी साधारणपणे १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालवधीत होत असते. उशिराचा पेरा ऑक्टोबरअखेर होतो. यंदा मात्र अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागात ज्वारीची पेरणी सुरू झाली नाही. हरभरा, गहू, मका या पिकांच्या लागवडीवरही त्याचा परिणाम जाणवणार आहे. हरभऱ्याचे क्षेत्र सुमारे २१ लाख हेक्टर आहे.
शेतात अद्याप पाणी
राज्यात ऑक्टोबर अखेरपर्यंत ११४५ मिमी म्हणजे सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झाला आहे. अजूनही राज्यातील अनेक भागात पाऊस सुरूच आहे. यंदा राज्यात अनेक ठिकाणी सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. जमिनीत पाणी मुरत नसल्याने जमिनी चिबाड बनल्या आहेत.
राज्यात ६ नोव्हेंबरनंतरच थंडीची चाहूल
पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी ६ नोव्हेंबरपर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. ६ ते ८ नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. मोसमी वारे माघारी जातानाच्या काळात राज्यभरात पाऊस पडला. त्यानंतर अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र, तसेच बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गेल्या काही दिवसांत राज्यभरात पाऊस पडला.
मोताळा तालुक्यात अतिवृष्टीसदृश्य पाऊस
●बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात रविवारी पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील धामणगाव बढे परिसराला पावसाने झोडपले.
●येथील पिंप्री महसूल मंडळात तब्बल ९१ मि.मी., तर पिंपळगाव महसूल मंडळात १०० मि.मी. पावसाची नोंद झाली.
●शेलापूर मंडळात ३३ मिमी, तर धामणगाव मंडळात ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
