UPSC Civil Services Final Result 2023 Declared: केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले असून आदित्य श्रीवास्तव देशात पहिला तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. गेल्या दोन परीक्षांमध्ये यूपीएससीचे पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावल्याचे दिसून आले होते. यंदा मात्र मुलांनी बाजी मारली आहे. यात नागपूरसह विदर्भातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

यंदा नागपूरमधून चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या पाच विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. यंदा यूपीएससीच्या परीक्षांमध्ये १०१६ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ३४७ उमेदवार खुल्या प्रवर्गाचे, ११६ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे, ३०३ उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, १६५ उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर ८६ उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत.

हेही वाचा : “नव्या स्वरूपातील गुन्हे सोडविण्याचे आव्हान झेलणारा पोलीस अधिकारी होणार”, सनदी सेवेत निवडप्राप्त अभय डागाची मनिषा

नागपूरमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्ये सुरेश बोरकर(६५८), मयुरी महल्ले (७९४), प्रांजली खांडेकर(७६१), शुभम डोंगरदिवे (९६३) यांचा समावेश आहे. तर पूर्व प्रशिक्षण केंद्रामधून उत्तीर्ण झालेल्यांमध्ये राजेश्री देशमुख(६२२), शुभम पवार(५६०), शुभम डोंगरदिवे(९६३ ), चिन्मय बन्सोड(८९३), अपूर्व बालपांडे(५४६) यांचा समावेश आहे. यंदा विदर्भातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : चंद्रपुरची कन्या शारदा मादे्शवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून यंदा ९२ विद्यार्थ्यांनी मुलाखतीची तयारी केली होती. यातील २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे केंद्राचे संचालक डॉ. लाखे यांनी सांगितले. यावर्षी नागपूर आणि विदर्भातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल upsconline.nic.in आणि upsc.gov.in या संकेतस्थळांवर सविस्तर निकाल पाहाता येईल.