नागपूर: नागपुरात भाजीपाल्याचे भाव कडाडले आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त प्रत्येक कुटुंबाच्या घरचे बजेट विस्कळीत होणार आहे.
नागपुरात यंदा एप्रिल महिन्यात भाजीपाल्यांच्या किमती कमीच होत्या, तेव्हा शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. मार्चमध्येही शेतकऱ्यांनी टोमॅटो, फूल कोबी, पत्ता कोबी, पालक कमी भावात विकली. मे महिन्यात तपत्या उन्हात आवक कमी झाली आणि भाव वाढले. सध्या घाऊकमध्ये भाज्यांचे भाव आटोक्यात असले, तरीही किरकोळमध्ये ग्राहकांना दुप्पट, तिप्पट भावात खरेदी करावा लागत आहे. शहरात बहुतांश भाज्या १०० रुपये किलो, दर्जेदार लिंबू १० रुपये नग आहे. या भाजीपल्यावर नियंत्रण कुणाचे हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
नागपूर मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच भाज्यांचे भाव वाढू लागले. १५ रुपये किलोचे वांगे ४० रुपये, फूल कोबी ६० रुपये, परवळ, बीन्स, फणस १०० रुपयांवर पोहोचले आहे. किरकोळमध्ये आठवडी भाज्यांसाठी ७०० ते ८०० रुपये खर्च करावे लागतात. नेहमीप्रमाणे पालेभाज्यांमध्ये पालक स्वस्त, तर मेथी भाजी महागच आहे. पालक किरकोळ ३० ते ४० रुपये आणि मेथी ८० ते ९० रुपये किलो आहे. तपत्या उन्हात शरीराला थंडावा देणाऱ्या लिंबाचे भाव दर्जा आणि आकारानुसार लिंबाचे १० ते २० रुपये नग आहेत.
दरवाढीचा शेतकऱ्यांना लाभ काय?
एप्रिल महिन्यात बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. मे महिन्यात आवक कमी होऊ लागतात, भाव वाढले आणि शेतकऱ्यांना थोडा फायदा होऊ लागला. बाजारात पालक आटोक्यात तर मेथी महागच आहे.
भाजीपाला विक्रेत्यांच्या संघटनेचे म्हणणे काय ?
दोन महिन्यांआधी वाढलेले भाजीपाल्यांचे भाव एप्रिलमध्ये कमीच होते. मे महिन्यात आवक कमी होताच भाव पुन्हा वाढू लागले. सध्या स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून आवक कमी आहे. मे महिन्यात भाव वाढले आणि जुलै महिन्यात नवीन आवक आल्यानंतर भाव पुन्हा कमी होतील, असे भाजीपाला असोसिएशनचे म्हणणे आहे.
नागपुरातील भाजीपालाचे भाव काय ? (रुपयांमध्ये)
भाजीपाला घाऊक भाव किरकोळ
टोमॅटो १५ ३०-४०
हिरवी मिरची ३० ६०-७०
कोथिंबीर ३०-४० ५०-६०
वांगे २० ३५-४०
फूल कोबी २०-२५ ४०-५०
पत्ता कोबी १५ २५-३०
ढेमस ३५-४० ७०-८०
सिमला मिरची ४० ८०-९०
कारले ३० ६०-७०
भेंडी २५-३० ५०-६०
चवळी शेंग ३० ५०
गवार ४० ७०-८०
दोडके ३० ६०-७०
तोंडले २५ ५०
बीन्स ४० ८०
फणस ४० ८०
पालक ८-१० २०
मेथी ४० ८०
कोहळे २० ४०
लवकी १० २०
काकडी १५-२० ३०-४०
मुळा २० ४०
गाजर ४० ७०-८०