सदस्यांकडून तीव्र विरोध, कुलगुरूंच्या हेतूबाबत शंका
अवघ्या देशाचे लक्ष महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालाकडे लागले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २४ ऑक्टोबर या निकालाच्या दिवशीच विधीसभेची बैठक बोलावली आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाला सदस्यांकडून विरोध होत आहे.
विधीसभेची बैठक सुरुवातीला २१ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली होती. मात्र, त्याच दिवशी मतदान होणार असल्याने ती पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. मंगळवारी बैठकीची नवीन तारीख जाहीर करण्यात आली. मात्र, मतमोजणीच्या दिवशी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याने सदस्यांमधून तीव्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. विधीसभेचे बहुतांश सदस्य हे विविध राजकीय पक्षांशी जुळले आहेत. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी सदस्यांना बैठकीला उपस्थित राहणे जड जात आहे. विधीसभेचे सदस्य हे पदवीधर विद्यार्थ्यांचे, महाविद्यालयांचे आणि शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे विद्यार्थी, महाविद्यालयाशी संबंधित अनेक धोरणात्मक विषयावर या बैठकीत चर्चा होते. म्हणूनच विधीसभेच्या बैठकीला फार महत्त्व असते. मात्र, कुलगुरूंनी महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या दिवशीच बैठक ठेवल्याने शंका उपस्थित केली जात आहे. विधीसभेमध्ये अनेकदा विद्यापीठ प्रशासनाला सदस्यांच्या प्रश्नांचा सामना करावा लागतो. त्यातच विद्यापीठाच्या आशीर्वादाने संलग्नित महाविद्यालयात झालेल्या नियमबा प्राचार्य भरतीच्या प्रकरणावर कुलगुरूंना घेरण्याची तयारी विधीसभेच्या सदस्यांनी केली आहे. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी बैठक घेतल्यास फार सदस्यांना उपस्थित राहता येणार नाही व कुणाच्या विरोधाविना बैठक आटोपती घेता येईल, असा कुलगुरूंचा हेतू असल्याचा आरोप काही सदस्यांनी केला आहे.
विधीसभेच्या बैठकीची तारीख ही राज्यपाल कार्यालयाकडून ठरत असते. त्यानुसारच २४ ऑक्टोबरला बैठक जाहीर करण्यात आली. तसाही २४ ऑक्टोबर हा कामाचा दिवस आहे. त्यानंतर दोन दिवसांनी दिवाळी आहे. त्यामुळे बैठकीसाठी दुसरी कुठली तारीख ठरवण्यात अडचण होतीच. – डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू.