वर्धा : समाज माध्यमे हा आता युवकात चांगलाच रुळालेला प्रकार झाला आहे. चांगले, वाईट असे दोन्ही प्रकार या माध्यमातून दिसून येतात. या माध्यमातून अनेक गुन्हे घडल्याचे दिसून येते. तसेच बनावट खाते उघडून लोकांना फसविण्याचे पण प्रकार झालेत. ही घटना याच प्रकारातील. स्त्रीच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून विखारी जातीय व धार्मिक पोस्ट टाकण्याचा प्रकार करणाऱ्या एका युवकाचे बिंग अखेर उघडकीस आले आहे.
आर्वी येथील ही घटना आहे. मैथिली पालिवाल या नावाने फेसबुक अकाउंट होते. त्यावरून समाजात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रकार सुरू होता. तसेच महापुरुष व देवी देवतांचा अवमान करणारे लिखाण केल्या जात असे. यामुळे तणाव निर्माण होण्याच्या घडामोडी घडण्याची शक्यता उद्भवली होती. ही बाब सर्वप्रथम आमदार सुमित वानखेडे यांच्या निदर्शनास आली होती. एका फेसबुक पोस्टवरील चर्चे दरम्यान त्यांनी या फेक आयडीचा उल्लेख पण केला होता. त्यामुळे ही बाब चव्हाट्यावर आली. बिंग फुटले. संबंधित आरोपीचे कारस्थान लक्षात आले.संभाजी ब्रिगेड या संघटनेचा तालुका अध्यक्ष असलेला रोहण हिवाळे हाच असे बनावटी खाते चालवून तेढ निर्माण करीत असल्याचे स्पष्ट झाले.
पण उलट त्यानेच आपली बदनामी केल्या जात असल्याचा कांगावा सूरू केला. तशी तक्रार तो आर्वी पोलिसांत करण्यास गेला. पोलिसांनी चौकशी सूरू करीत त्यालाच ताब्यात घेतले. शेवटी आरोपी हिवाळे याने फेक आयडी आपणच चालवीत असल्याची कबुली पोलिसांना दिली. आणि मग त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एका विशिष्ट समाजाच्या महिलेच्या नावे फेक अकाउंट तयार करणे व त्या माध्यमातून विखारी प्रसार करण्याचा हा प्रकार घडला होता. त्यामुळे आर्वीकर संतप्त झाले होते. सदर आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करणारा कोणीही असो, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. आपला तो बाब्या तर दुसऱ्याचे ते कार्टे अशी भूमिका नं घेता उचित कारवाई व्हावी. समाज सेवेच्या बुरख्या आड असे प्रकार करणाऱ्यास कायद्याचा बडगा दाखविला पाहिजे, असा सूर नागरिकांत उमटत आहे. ही घटना लवकर उजेडात आल्याने संभाव्य धोके टळले, याबद्दल दिलासाही व्यक्त केल्या जात आहे.
