वर्धा – सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प निसर्गानुभव उपक्रमासाठी सज्ज झाला असून वन्यजीव निरीक्षणासाठी अभ्यासक व निसर्गप्रेमी नागरिकांकरिता विविध पाणस्थळांवर तयार करण्यात आलेल्या मचाणींची बांधणी पूर्ण झाली आहे.

बोर व्याघ्र प्रकल्पात दिवसा आणि रात्री निसर्गानुभव घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना बुधवार, दि. २२ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयात उपस्थित रहायचे आहे. या उपक्रमासाठी जुने व नवीन वनक्षेत्र तसेच हिंगणी, बांगडापूर व कवडस बफर या वनपरिक्षेत्रात नैसर्गिक पाणस्थळे तसेच कृत्रिम पाणवठ्यांजवळ ३५ मचाणी निर्माण करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकारी संस्थांमधील अनिष्ठ तफावत ७०० कोटींवर, पीक कर्ज वाटपात दिरंगाई

ऑनलाईन नोंदणी न केलेल्या निसर्गप्रेमी नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी होता यावे यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत बोर येथील कार्यालयात उपस्थित राहून नोंदणी करता येणार आहे. सहभागी नागरिकांना बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत व्याघ्र प्रकल्पाच्या वाहनाने त्यांच्या मचाणापर्यंत पोहोचविण्यात येईल व दुसऱ्या दिवशी दि. २३ मे रोजी सकाळी ८ वाजता पुन्हा त्यांना घेण्यासाठी वाहन पाठविले जाईल. या दरम्यान रात्रीच्या भोजनाची व्यवस्थाही मचाणीवर करण्यात येईल. नागरिकांनी सर्व नियम व अटींचे पालन करून सहभागी होण्याचे आवाहन बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांनी केले.

निसर्गानुभवसाठी जाताना

आधार कार्डची फोटो काॅपी (झेराॅक्स) आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत ठेवावा. ऑनलाईन फाॅर्म भरला असल्यास उत्तमच. फाॅर्म आपल्याकडे नसल्यास वेळेवरही भरून घेता येईल. दुपारचे जेवण करून यावे. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था व्याघ्र प्रकल्पाद्वारे केली जाईल. प्रत्येक मचाणीवर वनकर्मचारी राहणार असल्याने जास्तीचे खाद्यपदार्थ सोबत घेतल्यास सोयीचे होईल. सुका मेवा, फळे किंवा ऊर्जा टिकवून ठेवणारे पदार्थ, पेयपदार्थ सोबत असू द्यावे. प्रत्येक मचाणीवर थंड पाण्याची कॅन राहणार असली तरी पाण्याचा पुरेसा साठा स्वतःसोबतही असू द्यावा. पाणी जपून वापरावे. कपडे निसर्गपूरक असावेत. पांढरे शुभ्र, भडक किंवा चमकदार कपडे नकोत. लांब बाह्यांच्या कपड्यांसोबतच रात्रीसाठी टी शर्ट, शाॅर्टस्, छोटी सतरंजी, चादर यासह दुपट्टा, टाॅवेल, कॅप, छत्री, शूज, गाॅगल, कॅमेरा, टाॅर्च, वही, पेन, आवश्यक औषधी, इत्यादी नेहमीच्या जंगलभ्रमंतीकरिता वापरत असलेल्या वस्तू न विसरता सोबत ठेवाव्यात.

प्रत्यक्ष प्रगणनेत सहभागी होताना घ्यायची दक्षता

पाणवठ्याजवळील आपल्या मचाणाकडे जाताना आणि येताना गाड्यांचे हाॅर्न वाजवू नयेत. गाडीतील रेडिओ, ट्रांजिस्टर बंद ठेवावा. मचाणावर बसून असताना मोठ्याने बोलणे, गाणी म्हणणे, मोबाईलवर अथवा अन्य साधनांवर गाणी ऐकणे पूर्णतः टाळावे. अत्तर अथवा कोणत्याही सुगंधी द्रव्याचा वापर शरीरावर अथवा कपड्यांवर करू नये. प्लास्टीकच्या पिशव्या टाळाव्यात. चाॅकलेट अथवा बिस्किटांचे रॅपर, खाद्यपदार्थांची वेष्टणे, रिकामे डबे तसेच कोणत्याही प्रकारचे प्लास्टीक किंवा निरुपयोगी वस्तू जंगलात न फेकता आपल्या बॅगमध्येच ठेवाव्यात. प्रगणनेत मांसाहार, धुम्रपान, मद्यपान पूर्णतः वर्ज्य आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाते.

हेही वाचा – धक्कादायक! आरटीईचे समांतर कार्यालय सीताबर्डीत! लाखो रुपयांची खासगी कार्यालयातून उलाढाल

कोणत्याही कारणासाठी जंगलात आग प्रज्वलित करण्यास मनाई आहे. उदबत्ती, कासवछाप अगरबत्ती देखिल लावू नये. ज्वलनशील पदार्थ तसेच शस्त्र सोबत नेण्यास सक्त मनाई आहे. वन्यजीव (पशूपक्षी) पाणी पिण्यासाठी पाणवठ्याकडे येत असताना, पाणवठ्यावर पाणी पीत असताना शांतता बाळगावी. पाणवठ्यावर येताना वन्यप्राणी सर्वाधिक सावधगिरी बाळगत असतात. त्यामुळे छायाचित्रण करावयाचे असल्यास प्राण्यांचे पाणी पिऊन झाल्यानंतरच करावे. मात्र, कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा वापर पूर्णपणेटाळावा.सूर्य मावळल्यानंतर मचाणावरून खाली येण्याचे टाळावे. आवश्यक नैसर्गिक गरजा तत्पूर्वीच पार पाडाव्यात. मचाणावरून खाली येणे अत्यावश्यक असल्यास सहकाऱ्याला सोबत ठेवावे. रात्री वन्यजीव पाणवठ्यावर पाणी पीत असताना टाॅर्चचा वापर टाळावा. पाणवठ्यावरील नोंदी चंद्रप्रकाशात करणे अपेक्षित आहे. टाॅर्च आकस्मिक प्रसंगी वापरण्यासाठी सोबत बाळगावा. प्रगणनेवरून परत येताना जंगलातील कोणतीही वस्तू अथवा वन्यजीव, वन्यजीवांचे अवशेष सोबत आणू नयेत, तसेच वनसंपदेला कोणतेही नुकसान पोहोचवू नये. पर्यावरणस्नेही आणि वन्यजीवप्रेमी म्हणून सर्वच सहभागी सदस्यांनी नियमांचे काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे.

‘जंगलावरचा पहिला हक्क वन्यजीवांचा आहे, हे लक्षात असू द्यावे.’ – संजय इंगळे तिगावकर, सल्लागार समिती सदस्य, बोर व्याघ्र प्रकल्प