वर्धा : लागोपाठ घडलेल्या दोन रहस्यमय घटना जिल्ह्यास हादरवून सोडत आहे. शुक्रवारी सायंकाळी एका महिलेचे शव खड्ड्यात पुरल्याचे आढलून आले. तर आज सकाळी एका युवकाचे प्रेत नाल्यात दिसून आले आहे. पहिली घटना खुनाची असल्याचे तपासात उघड झाले आहे. तर आजच्या घटनेत युवकाचा खून की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस यंत्रणेसाठी हे एक गूढ ठरले आहे. त्याबाबत अद्याप काहीच माहिती पुढे आलेली नाही. घातपात असल्याची केवळ शंका व्यक्त होत आहे.

या दोन्ही घटना दोन्ही पोळ्याच्या दोन दिवसात घडल्या. दोन्ही घटना हिंगणघाट येथीलच आहेत. आज सकाळी हिंगणघाट तालुक्यातील धांबा गावाजवळील पुलाखाली अनोळखी मृतदेह आढळला.हिंगणघाट तालुक्यातील धांबा गावाजवळील छोट्या पुलाच्या खालील नाल्यात पाण्यात एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून, पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिस तपास सुरू आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूचे कारण अपघात, आत्महत्या की इतर काही आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अधिकृत माहिती पोलिस तपासानंतरच समोर येणार आहे. ही धक्कादायक घटना परिसरात चर्चेचा विषय ठरत असून, नागरिकांमध्ये भीती व उत्सुकता निर्माण झाली आहे.

शुक्रवारी सायंकाळी एक खून उजेडात आला. हिंगणघाट शहरातील इंदिरा वॉर्डात राहणाऱ्या सुभाष लक्ष्मण वैद्य याने आपली पत्नी माधुरी हिचा खून करीत तिला घरालगतच्या रिकाम्या प्लॉटमध्ये खड्डा करीत पुरले. पती पत्नीत वाद सूरू होते. त्यातून हा निर्घृण खून पतीने केला. या घटनेतील आरोपी पती सुभाष हा फरार असून त्याला या खुनात मदत करणाऱ्या त्याच्या मामास मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून खुनाचे रहस्य उलगडले. आरोपी पती सुभाष याने पत्नी माधुरीचा खून केला. तो उघडकीस येवू नये म्हणून मग पुरावा नष्ट करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने जेसीबी यंत्र भाड्याने घेत दहा फूट खोल खड्डा खोदून घेत त्यात पत्नीचे प्रेत पोत्यात भरून ते खड्ड्यात पुरले. पत्नीच्या आईवडीलांनी पोलीस तक्रार केल्यावर शोध सूरू झाला. तेव्हा मृत माधुरीचे कपडे व अन्य वस्तू जळलेल्या स्थितीत पोलिसांना सापडले. अखेर संशय वाटल्याने माती उपासण्यात आली तेव्हा हा कट उजेडात आला.