नागपूर: सिगारेटच्या पाकिटावर कर्करोगाच्या चित्रासह सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा इशारा नमुद असतो. त्याप्रमाने नागपुरातील केंद्रीय कार्यालयांतील उपहार गृहात जिभेचे चोचले पुरवणाऱ्या समोसे, पकोडे, लाडूसह इतरही तेलकट आणि गोड पदार्थ सावधपणे खाण्याचा सल्ला देणारे ठळक फलक लावले जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे त्याबाबतचे काय आदेश आहे? याबाबत आपण जाणून घेऊ या.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या नागपुरातील अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेसह राज्यातील केंद्रीय संस्थांमधील उपाहार गृहात रुग्ण व त्यांचे नातेवाईक, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची गर्दी दिसते. येथे समोसे, पकोडे, भजी, लाडू, वडा पावसह इतरही तेलकट, गोड पदार्थांवर ग्राहकांकडून ताव मारला जातो. त्यामुळे या उपाहारगृहात प्रत्येक वर्षी या पदार्थांची विक्री वाढतच असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान येत्या काळात तुम्ही येथे नास्ता करणार असल्यास तुम्हाला उपाहारगृहातच समोसा- जलेबी काॅम्बोसह इतर कोणतेही तेलकट व गोड पदार्थ खाणार असल्यास तुम्हाला त्यात फॅट, शुगरसह इतरही आवश्यक माहिती देणारा ठळक फलक दिसणार आहे. त्यावर या पदार्थ सावधतेने खाण्याचा सल्ला नमुद राहिल. त्यामुळे या आरोग्य विषयक सूचना देणाऱ्या फलकांकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

तेलकट व गोड पदार्थासह जंक फूडचे सेवन मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक असंसर्गजन्य आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांशी जोडलेले आहे. बहुतेक लोकांना सिगारेट आणि अल्कोहोलच्या सेवनाशी संबंधित आरोग्य समस्यांची जाणीव असली तरी, जंक फूडच्या सेवनाने संभावित आरोग्याच्या धोक्याबाबत फारशी माहिती नाही. नागपूर हे जंक फूडवर तंबाखूसारखेच दक्षतेची सूचना देणारे पहिले भारतीय शहर असण्याचे संकेत आहे. शहरातील केंद्रीय कार्यालयातील उपाहार गृहात प्रत्येक आकर्षक नाश्त्याभोवती एक रंगीत साइन बोर्ड तुम्हाला आठवण करून देईल. त्यात सावधतेने खा.. तुमचा भविष्यकाळ तुमचे आभार मानेल, असे फलक असेल. आरोग्य मंत्रालयाने नागपूरमधील एम्स नागपूरसह सर्व सरकारी संस्थांना ‘तेल आणि साखर बोर्ड’ लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर पदार्थात असलेले तेल व साखरेचे प्रमाणही नमुद करणे बंधनकारक असेल. येथील नागरिक लाडू, वडा पाव, पकोडा, समोसा, जलेबी इत्यादी लोकप्रिय नाश्त्यामध्ये साखर आणि तेलाच्या प्रमाणाबद्दल सतर्क करतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या परिपत्रकात नमुद आहे. एम्स नागपूरमधील कॅफेटेरिया आणि सार्वजनिक ठिकाणी लवकरच हे तेलकट आणि साखरयुक्त अन्न इशारे प्रदर्शित केले जातील, अशी सूत्रांची माहिती आहे. परंतु एम्सचे संचालक डॉ. पी. पी. जोशी यांनी मात्र तुर्तास याबाबतचे अधिकृत परिपत्रक आम्हाला मिळाले नाही. ते उपलब्ध झाल्यास कळवले जाईल, अशी माहिती दिली.