अमरावती : पावसाळा सुरू झाला असला, तरी विदर्भाचे नंदनवन मानल्‍या जाणाऱ्या चिखलदरा पर्यटनस्‍थळी पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी भटकंती थांबलेली नाही. सध्‍या दोन दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे, तर हॉटेल व्‍यावसायिकांना टँकरने पाणी विकत घ्‍यावे लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागरिकांना का सहन करावा लागतोय त्रास?

चिखलदरासह तालुक्‍यातील १४ गावांसाठी बागलिंगा प्रकल्‍पावरून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असले, तरी ते पूर्ण होईपर्यंत चिखलदरावासीयांना त्रास सहन करावा लागणार आहे. चिखलदरा शहराला जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. दररोज सुमारे सहा लाख लिटर पाणी आवश्‍यक असताना पाण्‍याचे स्‍त्रोत आटल्‍याने अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. शक्‍कर तलाव, कालापाणी तलावात मोजकाच जलसाठा उपलब्‍ध आहे. शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील आमझरी गावातून चिखलदरा शहराची तहान भागवली जाते.

हेही वाचा – पुण्याला जाण्‍यासाठी दररोज केवळ दोन रेल्‍वेगाड्या, त्यात आरक्षण मिळणे कठीण; विदर्भातील प्रवाशांना ट्रॅव्‍हल्‍सशिवाय पर्याय नाही

प्रतिटँकर सहाशे रुपये दर

पर्यटनस्‍थळावरील व्‍यावसायिकांना प्रतिटँकर सहाशे रुपये दराने पाणी विकत घ्‍यावे लागते. पाण्‍याच्‍या टंचाईमुळे पर्यटकांचीही गैरसोय होते. दुसरीकडे, चिखलदरा तालुक्यातील ३६ गावांतील आदिवासी बांधव नदीनाले, विहिरी, तलाव सगळीकडे पाण्यासाठी वणवण भटकंती करतात. हे गावकरी अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी लढा देत आहेत. या परिसरात १० ते १५ गावांत दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. बागलिंगा धरणावरून १५ गावांची व चंद्रभागा धरणावरून २१ गावांची गुरुत्वीय बलावर कार्य करणारी पाणीपुरववठा योजना तयार करण्यात आलेली आहे. ही योजना पूर्ण होण्‍याची प्रतीक्षा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity in chikhaldara mma 73 ssb