वर्धा : जल हे जीवन. ते शुद्ध तर शरीर स्वस्थ. अशुद्ध असेल तर घातक, जीवावर बेतणार. कोवळ्या वयातील मुलांना तर त्याचा धोका अधिकच. भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण केले तेव्हा काही तालुक्यांतील पाणी अशुद्ध व रोगास निमंत्रण देणारे ठरणार, असा इशारा देण्यात आला होता. तसेच हिंगणघाट तालुक्यातील एका शाळेत चाळीसवर मुलांना विषबाधा झाली होती, तेव्हा पाणी हा घटक त्यात होताच. म्हणून वर्धा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तपासणी केली. त्यात अनेक शाळेतील पेयजल पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले आहे. अखेर या शाळांना आज तंबी देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दूषित पाण्यामुळे विषबाधा होवू शकते. तपासणीत अशा काही शाळा दूषित पाणी पुरवत असल्याचे दिसून आले. आता या शाळांनी एका दिवसात पाण्याची टाकी ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छ करावी. शाळेतील आरओ मशीन नादुरुस्त असेल तर ती दुरुस्त करावी. ही मशीन नसेल तर मुलांना उकळते पाणी पिण्यास द्यावे. शाळेतील पाण्याचे स्रोत नियमित स्वच्छ करावे. पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन तपासून घ्यावी. लिकेज असेल तर तर दुरुस्त करावे. सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. तशा सूचना संबंधित मुख्याध्यापकांना द्याव्या, असे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितू गावंडे यांनी आज सायंकाळी दिले आहेत.

सेलू तालुक्यात यशवंत प्राथमिक बेलगाव व क्षीरसमुद्रा जि. प. शाळा, हिंगणघाट तालुक्यातील वाघोली प्राथमिक, हिंगणघाट शहरातील डॉ. बी. आर. आंबेडकर प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा, डोरला, बोपापूर, हडस्ती, धोची, पिपरी, गंगापूर, भिवापूर व सावंगी जोड या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व पिपरी येथील के. टी. महाजन विद्यालय, आर्वी तालुक्यातील कांचनपुर, बोथली, पौड, वडगाव, सायखेडा, दिघी, बहादूरपूर, विरूळ, शिरपूर, खाणवाडी, लाडेगाव, बेनोडा, नांदपूर, मातोडा या जिल्हा परिषद शाळा तसेच मॉडेल धानोडी व नेहरू विद्यालय विरूळ, कारंजा तालुक्यातील जाऊरवाडा शाळा, वर्धा तालुक्यातील संत चावरा सालोड, यशवंत सेवाग्राम, रोठा माध्यमिक विद्यालय, आंबेडकर शाळा सावंगी तसेच वर्धा नगर पालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या काही शाळा आहेत. सर्वाधिक दूषित पेयजल असलेल्या शाळा वर्धा तालुक्यात दिसून आल्या आहेत. विशेष म्हणजे, विख्यात पोद्दार इंटरनॅशनल या प्रसिद्ध इंग्रजी माध्यमाच्या नागठाणा येथील शाळेतही दूषित पाणी आढळून आले असून इशारा देण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which schools in wardha district have water that is dangerous to drink pmd 64 amy