नागपूर : शहरातील अपघातप्रवण चौक-रस्त्यांची माहिती काढा. तो रस्ता महापालिका, एमएसआरडीसी, एनएचएआय यांच्यापैकी कुणाच्या अख्त्यारित आहे, हे समजून घ्या. संबंधित कार्यालयाला नोटीस द्या. तरीही कार्यवाही झाली नाही, तर या कार्यालयापुढे आंदोलन करा. या आंदोलनाला माझा पाठिंबा असेल, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. रोडमार्क फाउंडेशनच्या प्रथमोपचार प्रशिक्षण अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरातील कवीवर्य सुरेश भट सभागृहात शनिवारी आयोजित या कार्यक्रमाच्या मंचावर मुधोजी राजे भोसले, वाहतूक पोलीस उपायुक्त चेतना तिडके, आयएमए नागपूरच्या अध्यक्ष डॉ. वंदना काटे, राजेश लोया, रोडमार्क फाउंडेशनचे प्रमुख राजू वाघ उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, अपघातांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तरुण मुलांच्या अपघातामुळे अनेक कुटुंबांनी आधार गमावला आहे. अशी वेळ कुणावरही येऊ नये, यासाठी अपघात रोखण्यावर भर दिला पाहिजे. राजू वाघ आणि चंद्रशेखर मोहिते ही मंडळी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते तयार झाले तर अपघातमुक्त नागपूरचे स्वप्न दूर नाही.

हेही वाचा – १६ एसटी कर्मचाऱ्यांची बढती रद्द होणार! पदस्थापनेच्या ठिकाणी रूजू होण्यास टाळाटाळ

रोड इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, एज्युकेशन, एन्फोर्समेंट आणि इमर्जन्सी ही पंचसूत्री समजून घेतली तर अपघात रोखणे शक्य होईल, असेही गडकरी म्हणाले. यावेळी रोडमार्क फाउंडेशनला पाच लाख रुपयांची मदत गडकरींनी जाहीर केली. अपघात झाल्यास प्रथमोपचार कसा द्यावा, याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. जनजागृती करणारे पथनाट्यही सादर करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why union minister nitin gadkari says to protest mnb 82 ssb