गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यांमुळे दहशतीत असलेल्या देसाईगंज तालुक्यावर आता रानटी हत्तींच्या रूपाने नवे संकट कोसळले आहे. रानटी हत्तींचा कळप देसाईगंज तालुक्यात दाखल झाल्याने वन विभागाकडून आसपासच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बरेच दिवस कुरखेडा तालुक्यात मुक्काम ठोकल्यानंतर हा कळप चारा आणि पाण्याच्या शोधात कोरोगाव जवळील रावणवाडी टोली परिसरात दाखल झाला आहे. येथील एका तळ्यात मुक्तपणे जलक्रीडा करताना काही नागरिकांनी त्यांना कॅमेऱ्यात टिपले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिनाभरापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींच्या कळपाने धानोरा, कुरखेडा तालुका होत देसाईगंज तालुक्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. कुरखेडा आणि धानोरा तालुक्यात या कळपाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले आहे. सोबतच एका नागरिकाला जखमीदेखील केले होते. त्यामुळे एकीकडे वाघ आणि दुसरीकडे रानटी हत्तींचा कळप, अशा दुहेरी संकटात देसाईगंज रहिवासी आणि वन विभाग सापडल्याचे चित्र आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wild elephants water sports in desaiganj forest department on alert gadchiroli tmb 01