भंडारा : विदर्भातील भंडारा जिल्ह्यात असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या चांगली असून अन्य प्राणीही मोठ्या प्रमाणात आढळून येतात.येथील वाघांना बघण्यासाठी दूरवरून पर्यटक येत असतात. देश-विदेशातील पर्यटकांनाही येथील वाघांनी भुरळ घातली आहे. मात्र आता दुर्मिळ काळा बिबट्याला वन्यजीव छायाचित्रकार श्रवण फाये यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केले आहे. तसेच फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. भंडारा जिल्ह्यात का बिबट्या दिसल्याचे व्हिडिओ पाहतात वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे अनेक जण या काळा बिबट्याचे दर्शन करण्याकरिता रात्रीच्या वेळी जंगल परिसरात जात आहेत.
यापूर्वीही भंडाऱ्यात काळा बिबट्या दिसल्याच्या बातम्या आल्या आहेत. विशेषतः, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात काळा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला होता. काही दिवसांपूर्वी असाच काळ्या रंगाचा बिबट्या दिसतात एका क्षणाचाही विलंब न करता श्रवण यांनी काळ्या बिबट्याचे फोटो कॅमेऱ्यात कैद केला. भंडारा जिल्ह्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्राला लागुन असलेल्या नागपूर आणि भंडाऱ्याच्या सीमेवर असलेल्या मोगरकसा येथील राखीव जंगल परिसरात काळ्या बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे.
येरली येथील वन्यजीव छायाचित्रकार श्रवण फाये यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये या दुर्मिळ काळ्या बिबट्यांचे स्पष्ट चित्रण आढळून आले आहे. काळा बिबट्या अत्यंत दुर्मिळ समजला जातो आणि भारतात याचे अत्यल्प प्रमाणात अस्तित्व नोंदवले गेले आहे. मोगरकसा परिक्षेत्रात या बिबट्यांचे दिसणे म्हणजे जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. वन्यजिव प्रेमी या परिसरात काळा बिबट्या पाहण्यासाठी रात्रीला जंगलात फेऱ्या मारत आहेत.
महाराष्ट्रात बिबटे मोठ्या संख्येने आहेत. पण, काळ्या रंगाचे बिबटे मोजकेच. हा प्राणी ब्लॅक पँथर या नावाने ओळखला जातो. त्यांना काही लोक बगीरा या नावानेही ओळखतात. हिंदीमध्ये त्याला काला तेंदुआ असेही नाव आहे. या बिबट्याचा रंग काळा असला, तरी त्याच्या सर्व सवयी या सर्वसामान्य बिबट्यासारख्याच असतात. त्याच्या शरिरात मेलॅनिन हे त्वचेतील रंगद्रव्य जास्त प्रमाणात असल्यामुळे रंग गडद काळा दिसतो. तुम्ही जवळून बघितले किंवा फोटोचा क्लोजअप बघितल्यास इतर बिबट्यांप्रमाणेच त्याच्याही अंगावर पोकळ गोल प्रकारातील डिझाइन दिसते. काळे बिबटे मुख्यतः कर्नाटक, तमिळनाडूसह दक्षिणेतील दाट जंगलांमध्ये अधिक प्रमाणात दिसतात.
भंडारा जिल्ह्यात असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ काळा बिबट्या कॅमेरात कैदhttps://t.co/2jrmCKvB4K
— LoksattaLive (@LoksattaLive) August 5, 2025
(सौजन्य- वन्यजीव छायाचित्रकार श्रबण फाये)#blackleopard #Maharashtra pic.twitter.com/CLUBe0rcO4
आपल्याकडे या काळ्या बिबट्याला बगीरा नाव मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे जंगलबुक हे कार्टून आणि सिनेमा हे होय. या कथानकात छोट्या मोगलीचा सांभाळ करणाऱ्या टीममध्ये काळ्या रंगाचा बिबट्या होता. त्यामध्ये त्याचे नाव बगीरा असल्याने अनेक लोक खऱ्या बिबट्यालाही आता बगीरा म्हणायला लागले. काळ्या बिबट्यांच्या त्वचेमध्ये रंगद्रव्य जास्त म्हणून ते काळे दिसतात.