यवतमाळ : हातात टॉर्च आणि टेमिफॉसचे द्रावण घेऊन शहरातील गल्ल्यांमध्ये १५० महिलांची फौज घरोघरी जाऊन डास अळ्यांचा शोध असल्याचे हे चित्र आहे शहराने डेंग्यूविरुद्ध पुकारलेल्या प्रभावी युद्धाचे. जिल्हा हिवताप कार्यालय आणि नगरपरिषदेने ’वस्तीसेविकां’च्या माध्यमातून घरोघरी जाऊन डास उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.

सन २०२३ मध्ये यवतमाळ शहरात ६६ डेंग्यू रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेपुढील आव्हान वाढले होते. यावर मात करण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तन्वीर शेख यांनी वस्तीसेविकांच्या नियुक्तीची संकल्पना मांडली. या उपक्रमामुळे २०२४ मध्ये रुग्णसंख्या घटून केवळ १४ वर आली. या यशाच्या पार्श्वभूमीवर, २०२५ मध्ये जिल्हाधिकारी विकास मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार पत्की आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अधिक व्यापक करण्यात आला आहे. १५० वस्तीसेविका शहरातील ७३ हजार ४९० घरांमध्ये महिन्यातून दोनदा सर्वेक्षण करत आहेत. घरातील पाण्याची भांडी, कुंड्या, टायर्स तपासून डासअळ्या नष्ट करणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम त्या करत आहेत. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत ही मोहीम अविरत सुरू राहणार असून, यामुळे डेंग्यू नियंत्रणात यश मिळत असल्याचा विश्वास डॉ. तन्वीर शेख यांनी व्यक्त केला आहे.

प्रत्येक घर, प्रत्येक कोपरा तपासणीखाली

वस्तीसेविकांचे काम अत्यंत सूक्ष्म पातळीवर चालते. त्या घरातील पाण्याची भांडी, टाक्या तर तपासतातच, शिवाय अनेकदा दुर्लक्षित होणारे फ्रिजच्या मागील ट्रे, फुलदाण्या, कुंड्यांखालील ताटल्या आणि परिसरातील टाकाऊ वस्तूही तपासतात. जिथे डासअळी आढळेल, ती जागा त्वरित रिकामी केली जाते किंवा औषधाने निर्जंतुक केली जाते. डासांची उत्पत्ती मुळातच रोखण्याची ही पद्धत सर्वाधिक प्रभावी ठरत आहे. यामुळे शहरातील डासांची उत्पत्ती रोखण्यात हिवताप विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. सध्या दवाखाने डेंग्यू तापाच्या रुग्णांनी खचाखच भरले आहेत. अशावेळी ही मोहीम तापाचे आजार रोखण्यासाठी सहाय्यकारी ठरत आहे.

ओळखा डेंग्यूच्या ’टायगर’ डासाला

डेंग्यूचा फैलाव ’एडिस इजिप्टाय’ नावाचा डास करतो. त्याच्या अंगावर काळे-पांढरे पट्टे असल्याने त्याला ’टायगर मॉस्क्यूटो’ असेही म्हणतात. हा डास दिवसा चावतो आणि घरातील स्वच्छ साठवलेल्या पाण्यात अंडी घालतो. पाण्याच्या टाक्या, कुलर, कुंड्या आणि भंगार साहित्यात साचलेले पाणी त्याच्यासाठी सर्वोत्तम उत्पत्तीस्थाने आहेत. त्यामुळे आठवड्यातून एकदा ’कोरडा दिवस’ पाळणे अत्यंत महत्वाचे आहे.