यवतमाळ : महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथे एका शेतात सशस्त्र दरोडा टाकून एक कोटींच्या वर मुद्देमाल लंपास करण्यात आला. या घटनेतील आरोपींचा अद्यापही सुगावा लागला नसताना शुक्रवारी मध्यरात्री तालुक्यातील गुंज – खडका रस्त्यावर लुटारूंनी वाहन चालक, मदतनीसाला मारहाण करून चक्क १६ क्विंटल मासोळीसह चारचाकी वाहन लंपास केले. महागाव तालुक्यात घडत असलेल्या चोरी, दरोड्यांच्या या घटनांनी नागरिक दहशतीत आहे.

शुक्रवारी मध्यरात्री गुंज – खडका मार्गावर अज्ञात लुटारूंनी बोलेरो वाहनचालकास अडवून बेदम मारहाण केली. त्यानंतर चालका व वाहकास दोरखंडाने बांधून लगतच्या नाल्यात फेकून दिले व लुटारू वाहन घेवून पसार झाले. शनिवारी सकाळी नागरिकांना दोरीने बांधलेल्या अवस्थेत इसम नाल्यात आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सय्यद रफिक सय्यद अली (रा. अदिलाबाद) असे वाहन चालकाचे नाव आहे. तो बोलेरो पिकअप वाहन (क्र. टीएस ०१, यसी ६२६२) मध्ये १६ क्विंटल मासोळी घेवून तेलंगणातील निर्मलकडे निघाला होता. पुसद-गुंज-माहूर रस्त्यावर असलेल्या गुंज पायरिका माता मंदिराच्या समोर अचानक तीन चार अज्ञात व्यक्ती वाहनाच्या समोर आले. त्यांनी शस्त्राच्या धाकावर वाहन अडविले. वाहन चालक व मदतनीस या दोघांनाही वाहनाखाली खेचून बेदम मारहाण केली. पैशांची विचारणा केली. मात्र दोघांकडेही जास्त पैसे नव्हते. त्यामुळे दोघांनाही मारहाण करून दोराने बांधून नाल्यात फेकले. चोरटे वाहन घेवून पसार झाले. सकाळी या घटनेची माहिती ळिाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी वाहनचालक सय्यद अली याच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दीड महिन्यापूर्वी गंज येथे तलवारीच्या धाकावर शेतात दरोडा टाकून ३० बकऱ्या चोरून नेल्या होत्या. या प्रकरणाचाही पोलिसांना अद्याप सुगावा लागला नाही.

हेही वाचा – आनंदवार्ता…विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार! महामंडळ म्हणते…

हेही वाचा – मोसमी पाऊस २० जुननंतर पूर्णपणे सक्रिय होणार

गेल्या आठवड्यात शनिवारी संतोष कुमार मनोहर पांडे यांच्या शेतातील घरात अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. घरातील महिलांवर शस्त्रांचे वार करीत दरोडेखोरांनी घरातील सोन्याचे दागिने व एक कोटींच्या आसपास रक्कम लुटून नेली. चिल्ली इजारा येथील दरोड्यातील आरोपी शोधण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. त्यातच आता या घटनेने महागाव तालक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस यंत्रणा आरोपींचा शोध घेवू शकत नाही, असा चोरट्यांचा समज झाल्याने या घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा आहे. आता वाहन चालकास बांधून वाहन चोरून नेल्याने वाहनधारकांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.