नागपूर : तोंडाला रुमाल बांधून घरात शिरलेल्या युवकाने सेवानिवृत्त पोलीस हवालदारास लुटले. गळ्यातील २५ ग्रॅमची सोनसाखळी, पाच ग्रँमचा सोन्याचा लॉकेट आणि पाच हजार रुपये रोख घेऊन पळाला. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या नेतृत्वातील पथकाने तब्बल ७० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटविली. त्याला मानेवाडा परिसरातून अटक केले. ओमप्रकाश (२१) रा. सक्करदरा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जवाहर नगर येथील रहिवासी महेंद्रकुमार वर्मा (८२) हे शहर पोलिस खात्यात हवालदार या पदावर होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. फिर्यादी मीना वर्मा (६२) या वकिल आहेत तर मुलगा डॉक्टर आहे. पीडित वयोवृध्द आणि आजारी असल्याने त्यांच्यासाठी ‘केअर टेकर’ नियुक्त केले आहे. आठ वर्षांपासून केअर टेकर त्यांना आंघोळ घालून देतात आणि तयार करून व्हिल चेअरवर बसवितात.

घटनेच्या दिवशी म्हणजे १९ मार्चला नेहमीप्रमाणे सकाळी केअर टेकर घरी आले. त्यांनी वर्मा यांना व्हरांड्यात व्हिल चेअरवर बसविले. त्यांची आंघोळ घालायची असल्याने पाणी गरम करण्यासाठी ते मागच्या भागात गेले. पीडिताचा मुलगा डॉक्टर, त्यांची पत्नी आणि मुले तसेच फिर्यादी मुलगी आतमधल्या खोलीत झोपले होते. सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आरोपी तोंडाला रुमाल बांधून त्यांच्या घरात शिरला. काही कळण्याआधीच पीडिताच्या गळ्यातील सोनसाखळी, सोन्याचा लॉकेट आणि पाच हजार रुपये घेऊन पळाला. केअर टेकर त्यांना आंघोळ घालण्यासाठी व्हरांड्यात आले असता लुटपाटीचा प्रकार उघडकीस आला. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

असा घेतला शोध

पोलिसांनी जवळपास 70 सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये एक संशयीत युवक दिसला. ओळख पटविल्यानंतर त्याच्या मोबाईल नंबर वरून घराचा पत्ता घेतला. तो मानेवाडा परिसरात असताना पोलिसांनी त्याला अटक केले. लुटपात करताना त्याने पूर्ण काळजी घेतली होती. पीडिताच्या घरापर्यंत तो दोन किमी अंतर पायी चालत गेला. तोंडावर रुमाल बांधले आणि लुटपाट करून पायीच निघाला. विशेष म्हणजे घटनेच्या वेळी मोबाईलही त्याने जवळ ठेवला नाही. परंतु वरिष्ठ पोलिस निरीक्षक भेदोडकर यांनी हुडकून काढले. मात्र, ओमप्रकाश असे कृत्य करू शकेल, यावर डॉक्टरच्या कुटुंबीयांना विश्वास बसत नाही.

यासाठी केली लुटपाट

पीडिताचा मुलगा डॉक्टर असून त्यांचे रूग्णालय आहे. त्याच रूग्णालयात आरोपी ओमप्रकाश हा दोन वर्षांपासून अटेंडन्सचे काम करतो. ओमप्रकाशने बीएसस्सी पर्यंत शिक्षण घेतले आहेत. त्याचे वडिल प्रॉपर्टी डिलगचे काम करायचे. ते कर्ज बाजारी झालेत. त्यांच्यावरील कर्ज फेडण्यासाठी लुटीची योजना आखली, असे पोलिस चौकशीत त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man robbed retired police constable stealing gold and cash adk 83 sud 02