नागपूर : गिट्टीखदान परिसरात मानवता नगरात नवरात्रोत्सव मंडपातील दुर्गामातेच्या मूर्तीची एक विक्षिप्त तरुणाने विटंबना केल्याची घटना ताजी असतानाच नंदनवन परिसरातल्या राजेंद्र नगरातील महादेव मंदिरात आणखी एका मनोरुग्णाच्या कृत्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

हा मनोरुग्ण महादेवाच्या पिंडीवर संशयास्पदरित्या लघूशंका करतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी एकच गोंधळ घातला. परिसरात मोकाट फिरणाऱ्या मनोरुग्णांवर कोणाचाही अंकूश राहिलेला नसल्याने नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला.

नंदनवन परिसरातील राजेंद्र नगरात एक महिला सकाळी साडेसातच्या सुमारास पूजा करत असताना हा मनोरुग्ण संशयास्पदरित्या महादेवाच्या पिंडीवर शर्टच्या आडून लघूशंका करत पसार झाला. महिलेने मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगितल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात जमावाने संताप व्यक्त केला. विकृत मानसिकतेच्या या मनोरुग्णाला ताब्यात घेऊन तातडीने त्याची मनोरुग्णालयात रवानगी करण्याचा संतापही नागरिकांनी नंदनवन पोलिसांकडे व्यक्त केला. नंदनवन पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणात गुन्हा दाखल करून मनोरुग्णाचा शोध सुरू केला आहे.

कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्याची आत्महत्या

बजाज नगर पोलीस हद्दीतील कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ईश्वरलाल चौधरी असे विद्यार्थ्याचे नाव आहे. राजस्थानमधील बाडमेर येथील रहिवासी इश्वरलाल हा महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात निवासाला होता.

ईश्वरलालने मुलांच्या वसतिगृहातील खोली क्रमांक ११ मध्ये छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. पोलिसांना खोलीतून एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात विद्यार्थ्याने एका तरुणीशी प्रेमसंबंधाचा उल्लेख केला आहे. ईश्वरलाल आधीच विवाहित होता आणि त्याला दीड वर्षाचा मुलगा आहे. मात्र ईश्वरलालने तरुणीपासून आपले लग्न लपवले होते. तरुणीने लग्नासाठी टाकलेल्या दबावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.