जळगाव : शहरातील शिव कॉलनी थांब्याजवळील फर्निचर दुकानासह वाहन धुण्याच्या केंद्राला रविवारी आग लागली. आगीत लाखोंचे नुकसान झाले असून, महापालिकेच्या सात बंबांच्या मदतीने आग विझविण्यात आली. आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही.मुंबई- नागपूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या शहरातील शिव कॉलनी थांब्याजवळील हॉटेल बावर्चीशेजारी अर्जुनप्रसाद चंद्रबली शर्मा (रा. शिवधाम मंदिर, निमखेडी, जळगाव) यांचे फर्निचर दुकान असून, दुकानात जुन्या लाकडांपासून खाटा, देऊळ, खुर्ची, कपाट यांसह विविध साहित्य बनविले जाते. या दुकानाशेजारीच देवकिरण विलास पाटील (रा. निवृत्तीनगर, जळगाव) यांचे वाहने धुण्याचे केंद्र अर्थात कार वॉशिंग सेंटर आहे.

फर्निचर दुकानाला आग लागली. त्याची झळ शेजारील वाहन धुण्याच्या केंद्रालाही बसली. आगीत दोन्ही दुकानांतील साहित्य खाक झाले. यात फर्निचर दुकानातील सागवान लाकूड, यंत्रसामग्री, तयार वस्तू मिळून 15 लाखांचे, तर वॉशिंग सेंटरमधील मोटारी धुण्याचे यंत्र, व्हॅक्यूम क्लीनर, कोटिंग यंत्र, फर्निचर मिळून चार लाखांचे असे सुमारे 19 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. आगीची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन विभागाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले. तातडीने पाण्याचा फवारा मारत दोन-तीन तासांत आग विझविण्यात यश आले. परिसरातील रहिवाशांसह व्यावसायिकांनीही आग विझविण्यास सहकार्य केले. घटनेची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्यात कळविण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली.