जळगाव – हिमाचल प्रदेशातील शिमला येथे बुधवारी एका प्रवासी बसवर दरड कोसळून जळगाव शहरातील लक्ष्मी रामचंद्र विराणी (२५) या तरूणीचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा प्रशासनाने हिमाचल प्रदेश सरकारशी संपर्क साधून लक्ष्मीचा मृतदेह जळगावात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, भारत-तिबेट मार्गावरील बिथल (कालीमिट्टी) परिसरात मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यावरून अचानक एक मोठा दगड रस्त्यावरून धावणाऱ्या एका खासगी बसवर कोसळला. या दुर्घटनेत बसमधील दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १५ हून अधिक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. मृतांमध्ये जळगाव शहरातील मूळ रहिवाशी असलेली लक्ष्मी विराणी या तरूणीचा समावेश आहे.

लक्ष्मी ही पुण्यातील एका खासगी आयटी कंपनीत नोकरीला होती. कंपनीतील काही मैत्रिणींसह ती शिमला येथे पर्यटनासाठी गेली असता, बुधवारी त्यांच्या बसवर मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. त्यातच लक्ष्मीचा अन्य दुसऱ्या एका महिलेसह मृत्यू झाला. लक्ष्मीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच जळगावमधील नातेवाईक तातडीने शिमला येथे रवाना झाले. लक्ष्मीच्या मृतदेहावर जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यात रामपूर तालुक्यात घडलेल्या या भीषण अपघातानंतर पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मदतकार्याला वेग आला. जखमींना रामपूर-खानरी येथे महात्मा गांधी वैद्यकीय सेवा केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लक्ष्मी विराणीचा मृतदेह सध्या रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

गुरूवारी सकाळी शवविच्छेदनानंतर कागदपत्रांची पूर्तता करून लक्ष्मीचा मृतदेह तिचा सहकारी तरुण रामचंदानी याच्या ताब्यात देऊन अंत्यसंस्कारासाठी जळगावला पाठवण्यात येणार आहे. जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी स्वतः शिमला जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे. या अपघातामुळे लक्ष्मी विराणी यांच्या कुटुंबियांसह सहकाऱ्यांवर आणि मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.