Among the five suspects who absconded from Nawapur police station one of them was detained in a search operation in nashik | Loksatta

नंदूरबार: नवापूर पोलीस ठाण्यातून पाच संशयित फरार; शोध मोहिमेत एकाला ताब्यात घेण्यात यश

दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, हे संशयित पोलीस ठाण्याची खिडकी तोडून फरार झाले.

नंदूरबार: नवापूर पोलीस ठाण्यातून पाच संशयित फरार; शोध मोहिमेत एकाला ताब्यात घेण्यात यश
नवापूर पोलीस ठाण्यातून पाच संशयित फरार (संग्रहित छ्याचित्र)

सोमवारी पहाटे अटक करण्यात आलेल्या पाच संशयित दरोडेखोरांनी पोलीस ठाण्यातील खिडकी तोडून पोबारा केल्याची घटना नंदूरबारमधील नवापूर पोलीस ठाण्यात घडली आहे. अंतर्वस्त्रांवरच पळालेले हे संशयित गुजरातच्या सीमावर्ती भागात उसाच्या शेतात लपल्याने सकाळपासून त्यांना शोधण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. यातील एकाला पुन्हा ताब्यात घेण्यात यश आले आहे.

हेही वाचा- नाशिक: खर्चाला पैसे देत नाही म्हणून आजी-आजोबांची हत्या; संशयिताला अटक

नवापूर पोलिसांनी सोमवारी पहाटे एक वाजून १५ मिनिटांनी नवापूर शहर रेल्वे गेटजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यात हैदर उर्फ इस्राईल पठाण (२०, रा. कुंजखेडा), इरफान पठाण (३५), युसुफ पठाण (२२), गौसखाँ पठाण (३४, रा. ब्राम्हनी-गराडा) सर्वांचा तालुका कन्नड, जि. औरंगाबाद, अकिलखाँ पठाण (२२, रा. कठोरा बजार, ता. भोकरदन, जि. जालना) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडील वाहनात दरोड्यासाठी लागणारे हत्यार सापडले. हे पाचही संशयित औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या संशयितांना पोलीस ठाण्यातील कक्षात ठेवण्यात आले होते. रात्रीतून ते खिडकी तोडून पळून गेले. अंतर्वस्त्रांवरच फरार झालेल्यांनी लपण्यासाठी लगतच्या काही शेतांचा आसरा घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

हेही वाचा- धुळे पोलिसांकडून बनावट दारुचा अड्डा उद्ध्वस्त; ९५ लाखांपेक्षा अधिकचा ऐवज हस्तगत

दरम्यान, नंदुरबार पोलिसांकडून सोमवारी सकाळपासून शोध मोहीम सुरु करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षकांसमवेत सर्वच मोठे अधिकारी नवापूरमध्ये तळ ठोकून आहेत. अटक करण्यात आलेले संशयित हे घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, गुजरात पोलिसांच्या मदतीने एका संशयिताला पकडण्यात यश आले आहे. पोलिसांकडून याविषयी कोणतीही माहिती देण्यास नकार देण्यात येत आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 19:07 IST
Next Story
नाशिक: खर्चाला पैसे देत नाही म्हणून आजी-आजोबांची हत्या; संशयिताला अटक