नाशिक – आरोग्य विभागात कार्यरत आशा आणि गटप्रवर्तकांचा १६ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी संप सुरु आहे. शासनाने काही मागण्या मान्य केल्या असल्या तरी मुख्य मागण्या मान्य न झाल्याने आंदोलन चालुच आहे. बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर नाशिक जिल्हा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनच्या वतीने मोर्चा काढून ठिय्या देण्यात आला. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात वाद झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> स्वच्छता, पथदीप, सुरळीत पाणी पुरवठ्याकडे लक्ष; दिवाळीमुळे मनपा आयुक्त सतर्क – कामचुकार अधिकाऱ्यांना तंबी

नाशिक जिल्हा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी, भत्ता लागू करा, जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही, तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वेतनश्रेणी देण्यात यावी, आशा स्वयंसेविकांना कोणत्याही प्रकारची ऑनलाईन कामे सांगू नये, केंद्र सरकारने २०१८ पासून आशा व गटप्रवर्तकांना मोबदला वाढ न दिल्याने ती त्वरीत द्यावी, गटप्रवर्तकांचे नाव बदलून ‘सुपरवायझर’ करावे, आशा आणि गटप्रवर्तकांना किमान वेतन लागू करावे, गट प्रवर्तकांना १० हजार रुपये वाढ करा, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना मोबदल्यात वाढ द्या, समायोजन करा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन सुरू असतांना आंदोलक आणि पोलीस यांच्यात वाद झाले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांना पोलीस वाहनात बसवले जात असतांना आशा, अंगणवाडी सेविकांनी वाहनाला घेराव घातला. चर्चेनंतर या वादावर पडदा पडला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asha workers in health department protest in front of zilla parishad office zws