परीक्षेसाठी अभ्यास सुरू असताना साहित्य पुरेसे उपलब्ध नाही. अवांतर वाचन करायचे आहे, पण वेगवेगळी पुस्तके ‘ब्रेल लिपी’त उपलब्ध नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करायची तर कशी? नेत्रहिनांसमोरील विविध अडचणींवर तोडगा काढण्याचा प्रयत्न अनघा कुलकर्णी करत आहे. त्या अंतर्गत वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके त्यांनी ध्वनिमुद्रित केले असून त्याचा लाभ असंख्य नेत्रहिनांना झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांचे हे काम नि:शुल्क असून या खजिन्याचा लाभ शहरातील केटीएचएम महाविद्यालयासह राज्यातील विद्यार्थी घेत आहेत.

समाजकार्याची आवड असणाऱ्या कुलकर्णी यांनी पठडी बाहेर जात काम करण्यास प्राधान्य दिले. पुणे येथील प्राची गुर्जर यांच्या ‘यशोवाणी’ संस्थेशी त्यांचा परिचय झाला. या माध्यमातून त्यांनी अनोखे काम हाती घेतले. संस्थेचे मुख्य उद्दिष्ट एकच नेत्रहिनांना लागणाऱ्या अभ्यासविषयक पुस्तकांसह अवांतर पुस्तके उपलब्ध करून द्यायची. या एककलमी ओळीने त्यांनी कामास सुरुवात केली. यासाठी पती विनय यांच्यासह समविचारी काही महिला त्यांना मदत करतात. सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे नेत्रहीन विद्यार्थीही परीक्षा आल्यावर जागे होतात.

वर्गात अभ्यास खूप झालेला असतो, मात्र परीक्षेच्या वेळी काही संदर्भ आवश्यक असतात. काही प्रकल्प तयार करायचे असतात. त्यासाठी अवांतर माहिती आवश्यक असते. ती मिळवायची कुठून, हा प्रश्न त्यांच्या समोर येतो. त्या वेळी अनेकांकडून एखाद्या विशिष्ट पुस्तकांचा संदर्भ दिला जातो. ते पुस्तक बाजारात मिळतेदेखील. पण वाचायचे कसे? घरातील कोणी वाचून दाखविले तरी ते लक्षात राहील की नाही, असे अनेक प्रश्न भेडसावत असताना यशोवाणीचा उपक्रम या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत आहे. नेत्रहीन विद्यार्थ्यांसाठी हा खजिना मोफत स्वरूपात खुला आहे. त्यात अट एवढीच की याचा व्यावहारिक तसेच गैरवापर होऊ नये. तसे संबंधितांकडून पत्रही लिहून घेण्यात येते. आजवर असंख्य विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेतला असून केटीएचएम महाविद्यालयांसह अन्य काही विद्यालयांशी त्यांनी संपर्क साधत ही ध्वनिमुद्रित माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे.

१.५ टीबीहून अधिक माहिती संकलित

महाविद्यालयीन विश्वात कला, वाणिज्य, संस्कृत, ज्योतिष, शिक्षणशास्त्र, संगीत यासह स्पर्धा परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्र लोकसेवा आयोग यासह वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची पुस्तके त्यांनी ध्वनिमुद्रित केली आहेत. काही चरित्रांसह आत्मचरित्रपर पुस्तकांचाही यात समावेश आहे. या माध्यमातून त्यांच्याकडे १.५ टीबीहून अधिक माहिती संकलित झाली आहे. नाशिकसह मालेगाव, नांदेड, जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड या ठिकाणाहून अनेक विद्यार्थी त्यांच्याशी संपर्क साधतात. आपल्याला कोणते पुस्तक हवे ते त्यांना देतात. विशिष्ट कालावधीत त्यांना ध्वनिमुद्रित करून परत करायचे असते. यासाठी त्या सहकाऱ्यांची मदत घेतात. सर्वसामान्यांप्रमाणे वाचन या ठिकाणी चालत नाही. अल्प, पूर्णविराम सांगावे लागतात. तसे त्या त्या ठिकाणी येणारे नकाशे, चित्रे काय हे स्पष्ट करावे लागते. यामुळे वाचनाची गती काहीशी मंदावते. एका तासाला साधारण १० पाने या पद्धतीने वाचली जात असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यांच्या प्रयत्नामुळे एका विद्यार्थ्यांला मंत्रालयात नोकरी लागली असून अनेकांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.