नाशिक – देशातील प्रत्येक धार्मिक स्थळावर आता प्रसाद म्हणून ‘आयुष्यमान हेल्थ कार्ड’ देण्याची संकल्पना राबवली जाणार आहे. त्याची सुरुवात पंचवटीतील काळाराम मंदिरापासून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वितरणाचा शुभारंभ करण्याचा मानस असल्याची माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी दिली. विविध मंदिरे, संस्था आदी माध्यमातून नागरिकांना प्रसादरुपी आयुष्यमान कार्ड देण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होत आहे. तत्पुर्वी ते काळाराम मंदिरात भेट देणार आहेत. यावेळी या योजनेचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. शक्य झाल्यास मोदींच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून उद्घाटन करण्यासाठी देखील प्रयत्न केला जाणार आहे. नाशिकमधील श्री काळाराम मंदिराप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल.

हेही वाचा : मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर सुशोभिकरणासाठी दोन कोटींचा निधी

‘आयुष्यमान हेल्थ कार्ड’ योजनेची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त नागरिकांना योजनेत समाविष्ट करण्यासाठी नियोजन केले जात आहे. धार्मिक स्थळी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. ज्यांच्याकडे आयुष्यमान हेल्थ कार्ड नसेल, अशा भाविकांना मंदिरात ते देण्याची ही संकल्पना आहे. मंदिर परिसरात यासाठी कक्ष उभारला जाईल.

हेही वाचा : युवा महोत्सव की धार्मिक महोत्सव?

येणाऱ्या भाविकाची माहिती घेऊन मंदिरात जाताना त्यांची नोंदणी केली जाणार आहे. दर्शन घेऊन ते मंदिरातून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांच्या भ्रमणध्वनीत आयुष्यमान हेल्थ कार्ड तयार झालेले असेल. अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान कार्डच्या माहितीसाठी अद्ययावत भ्रमणध्वनी दिले जातील. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ मिळणार असल्याचे डॉ. शेटे यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushman health card scheme launching by pm modi nashik pbs