नाशिक – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली बी. डी. भालेकर मराठी शाळा पाडकामास महापालिका प्रशासनाने स्थगिती दिली असली तरी शाळा नुतनीकरणासह अन्य प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. या पार्श्वभूमीवर बी. डी. भालेकर शाळा बचाव समिती आक्रमक झाली असून १९ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

भालेकर शाळा ५७ वर्षांपासून गरीब व श्रमिक वर्गाच्या मुलांना शिक्षण देणारी प्रतिष्ठित संस्था आता नगरपालिकेच्या निर्णयामुळे संकटात सापडली आहे. महानगरपालिकेने या शाळेच्या जागेवर ‘विश्रामगृह’ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात नागरिक आणि समाजसंस्था संताप व्यक्त करीत आहेत. कोणाला विश्रांती हवी आहे ?, आमच्या मुलांना शिक्षण हवं आहे, विश्रांती नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. शाळा विद्यार्थ्यांच्या अभावामुळे नव्हे तर, सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बंद पडली, असा आरोप समितीने केला आहे.

वर्षानुवर्षे शिक्षक नेमले नाहीत, वर्गांची दुरुस्ती करणे टाळले. विद्यार्थ्यांना दूर ठेवण्याची नियोजित मोहीम राबवली गेली आता त्या जागेवर नेत्यांसाठी विश्रामगृह उभारण्याचा डाव रचला गेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे फक्त एका शाळेचे नव्हे, तर मराठी सार्वजनिक शिक्षणाच्या अस्तित्वाचे युद्ध आहे. शहरातील एकामागोमाग एक मराठी सरकारी शाळा संपवल्या जात आहेत. गरीबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणे, शिक्षणाचे खासगीकरण करणे आणि मराठी भाषेला दुय्यम स्थान देणं, हाच सत्ताधाऱ्यांचा खरा कार्यक्रम असल्याचा आरोप भालेकर शाळा वाचवा समितीने केला आहे.

समितीने भालेकर शाळा वाचवा स्वाक्षरी अभियान सुरू केले असून १९ नोव्हेंबर रोजी नाशिक महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राजू देसले, राजेंद्र बागूल, गुलाम शेख, शाहू खैरे, दीपक डोके, तल्हा शेख, ॲड. प्रभाकर वायचाळे, वसंत एकबोटे आदींनी केले आहे.

लोकप्रतिनिधीही आता आवाज उठवत आहे..

बी. डी. भालेकर शाळा जमीनदोस्त करत या ठिकाणी महापालिका विश्रामगृह बांधणार असल्याचा निर्णय झाला. या बाबत स्थानिक आमदार यांनी कुठलीही प्रतिक्रिया देणे टाळले. मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी आंदोलकांची भेट घेत शाळा पाडण्यापासून वाचवु असे आश्वासन दिले. उध्दव ठाकरे गटाचे खा. राजाभाऊ वाजे यांनी ही महापालिकेच्या निर्णयाविरोधात शड्डु ठोकला. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी शालेय इमारतीची पाहणी करुन या जागेवर शाळाच सुरू करावी, अशी मागणी केली.