Bhusawal Dadar Special Train Update जळगाव – पश्चिम रेल्वेच्या भुसावळ-दादर मार्गावर सद्यःस्थितीत सुरू असलेल्या विशेष गाड्यांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भुसावळहून जळगाव, धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबारमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या खान्देशातील प्रवाशांची मोठी सोय होऊ शकणार आहे.

जून २०२४ मध्ये पश्चिम रेल्वेने नंदुरबार-दादर दरम्यान विशेष रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सदरची गाडी नंदुरबारऐवजी भुसावळ येथून सुरू करण्याची मागणी खान्देशातील प्रवाशांकडून करण्यात आली. प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद देत जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनीही पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाशी त्या संदर्भात पत्रव्यवहार करून गाडी भुसावळ स्थानकातून सोडण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर, दादर-भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ-दादर (०९०५२) या दोन्ही त्रिसाप्ताहिक विशेष गाड्या आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावू लागल्या. तसेच दादर-भुसावळ (०९०४९) आणि भुसावळ-दादर (०९०५०) दरम्यान धावणारी साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी आठवड्यातून एक दिवस दर शुक्रवारी धावू लागली.

आठवड्यातून चार दिवस धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. सदरची मुदतवाढ २९ सप्टेंबरला संपणार असल्याने रेल्वे प्रशासनाने भुसावळ-दादर दरम्यानच्या साप्ताहिक आणि त्रिसाप्ताहिक गाड्यांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दादर-भुसावळ (०९०४९ ) आणि भुसावळ-दादर (०९०५०) दरम्यान आठवड्यातून एक दिवस दर शुक्रवारी धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी २६ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. याशिवाय दादर-भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ-दादर (०९०५२) दरम्यान आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणाऱ्या त्रिसाप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी २९ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे.

भुसावळ-दादर दरम्यानच्या विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली असली, तरी त्यांची वेळ तसेच थांबे आणि डब्यांची रचना यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि संकेतस्थळावर सात सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. प्रवाशांना विशेष रेल्वेच्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, उधना-पुणे ही नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी आता प्रवाशांमधून होत आहे. त्या संदर्भात प्राथमिक चर्चा खासदार स्मिता वाघ यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी केली आहे.