नाशिक : अनोख्या संकल्पनेवर आधारीत नुतनीकरण झालेल्या प्रमोद महाजन उद्यानाचे लोकार्पण नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, गायक सुरेश वाडकर आणि आ. देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या उद्यानाच्या नुतनीकरणासाठी आ. देवयानी फरांदे यांनी शासनाकडून पाच कोटींचा विशेष निधी उपलब्ध केला.

मागे पावसात उद्यानाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला होता. महापालिकेने ही भिंत उभारण्याचीही तसदी घेतली नाही. यावर बोट ठेवत आ. फरांदे यांनी महापालिकेच्या कार्यपद्धतीचे दाखले देत एखाद्या दिवशी महानगरपालिकेला फरांदे ताईंचा झटका दाखवावा लागेल, असा इशारा दिला.

गुरुवारी पहाटे पाच वाजता गंगापूर रस्त्यावरील प्रमोद महाजन स्मृती उद्यानाचे लोकार्पण आणि भाऊबीज पहाट कार्यक्रमात सुरेश वाडकर यांचे गायन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रसिकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली. उद्यानाच्या लोकार्पणप्रसंगी आ. फरांदे यांनी उद्यानाच्या वेगळेपणाची माहिती दिली.

नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा फरांदे या आमदार झाल्या आहेत. तत्पुर्वी त्या महानगरपालिकेत प्रदीर्घ काळ नगरसेवक होत्या. यावेळी त्यांनी उद्यानात मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध केल्या गेल्या असल्या तरी त्यांची योग्य प्रकारे देखभाल राखणे महत्वाचे असते. ज्या उद्यानाची देखभाल नीट राखली जाते, ते सर्वांना भावते. प्रमोद महाजन हे शहरातील सर्वाधिक गर्दी असणारे उद्यान आहे.

लोकार्पणाआधी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आपण बैठक घेतली. या उद्यानाच्या देखभालीकडे काटेकोरपणे लक्ष देण्याची सूचना केल्याचे आ. फरांदे यांनी सांगितले. यावेळी महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर त्यांनी ताशेरे ओढले. मागील १८ वर्षात महापालिकेने एक रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला नसल्याची खंत व्यक्त केली. पावसात उद्यानाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग पडला होता.

४० मीटरची ही भिंत होती. परंतु, महानगरपालिकेने ती बांधली नाही. अखेरीस आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली. शासनाकडून विशेष निधी आणून संपूर्ण उद्यानाचे नूतनीकरण केले. आमच्यासारखे आमदार राज्यातील चांगल्या प्रकल्पांना भेटी देतात. अनंत कान्हैरे मैदान छान करण्याचा प्रयत्न केला. तथापि, देखभालीबाबत सांगूनही योग्य प्रकारे देखभाल होत नाही. एखाद्या दिवशी महानगरपालिकेला फरांदे ताईंचा झटका दाखवावा लागेल, असे त्यांनी सूचित केले.

खासगीत महानगरपालिकेचे अनेकदा कान टोचले असून जाहीरपणे टोचलेले बरे असते, असे आ. फरांदे यांनी नमूद केले. यावर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या भाषणात भाष्य केले. आ फरांदे यांना प्रशासनाबाबत तक्रार करण्यास पुन्हा संधी मिळणार नाही, असा शब्द देत त्यांनी या वादावर पडदा टाकला.