मालेगाव : गेली काही दिवस मालेगाव शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात भाजपने महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. ईद,मोहरम यासारख्या मुस्लिम धर्मीयांच्या सणांच्या वेळी नियमितपणे पाणीपुरवठा होत असतो. परंतु हिंदूंच्या दसरा,दिवाळी या सारख्या सणांच्या वेळीच मालेगावातील पाणीपुरवठा नेहमीच विस्कळीत होत असतो. हे असे का होते, असा सवाल भाजपचे महानगर प्रमुख देवा पाटील यांनी महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांना विचारला आहे.
गेल्या तीन आठवड्यात मालेगावातील पाणीपुरवठा तीन वेळा विस्कळीत झाला आहे. गेल्या महिन्यात मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरात काही ठिकाणी दोन दिवस तर काही ठिकाणी नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस विलंबाने पाणीपुरवठा झाला. दोन दिवसापेक्षा जास्त काळ जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला वेळ लागला. त्यानंतर दुरुस्त करण्यात आलेल्या या जलवाहिनीला पुन्हा गळती लागली. गेल्या ३ व ४ ऑक्टोबर रोजी ही जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवावा लागला. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा शहरवासीयांना ४८ तास उशिराने पाणी मिळाले. शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी बुधवारी रात्री तिसऱ्यांदा फुटण्याचा प्रकार घडला आहे. तिच्या दुरुस्तीसाठी पुन्हा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत.
कधी जलवाहिनी गळती तर कधी विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कारणामुळे शहरातील पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्यामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे व महानगरप्रमुख देवा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त जाधव यांची भेट घेऊन यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. खास करून हिंदूंच्या सणांच्या बाबतीतच पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचा प्रकार घडत आहे. मुस्लिम धर्मियांच्या सणांच्या वेळी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही,याची पूर्णपणे काळजी घेतली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे महापालिका प्रशासन हिंदूंना सापत्नपनाची वागणूक देते का,असा प्रश्न देवा पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
वारंवार होणारे जलवाहिनी दुरुस्तीचे काम व त्यावर होणाऱ्या खर्चाबद्दलही शिष्टमंडळाने शंका उपस्थित केली आहे. देखभाल दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च केला जात असताना जलवाहिनीला गळती वारंवार कशी लागते,असा प्रश्न शिष्टमंडळाने उपस्थित केला. तसेच पाणीपुरवठा खंडित होत असल्याची पूर्वकल्पना वेळेवर दिली जात नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय वाढत असल्याबद्दलची तक्रार देखील यावेळी करण्यात आली. गेल्या महिन्यात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी मध्यरात्री फुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाणीपुरवठा विलंबाने होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले. त्यामुळे पाण्यासाठी लोकांना दिवसभर ताटकळत बसावे लागले,याकडेदेखील शिष्टमंडळाने आयुक्तांचे लक्ष वेधले. यंदा अतिवृष्टी झाल्याने सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. पाण्याची कुठेच वाणवा दिसत नाही. असे असताना मालेगाव शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तोही वेळेवर होत नसेल तर ते महापालिका प्रशासनाचे अपयश आहे, अशी टीका शिष्टमंडळाने केली. शहराला किमान एक दिवसाआड व नियमित वेळेला पाणीपुरवठा करावा,असा आग्रह यावेळी धरण्यात आला.
शिष्टमंडळात लकी गिल, संदीप भुसे, मिलिंद भालेराव, ॲड. योगेश निकम, सुरेखा भुसे, कल्पना पाटील, नालिनी पाटील, दिलीप पाथरे, निलेश सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.