जळगाव – पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू झाल्यानंतर अवजड वाहने त्यावरून सुसाट धावत आहेत. दरम्यान, बाह्यवळण महामार्गामुळे जळगाव ते भुसावळ तसेच धुळ्याच्या अंतरात फार फरक पडलेला नाही. मात्र, कोणत्याही दिशेला गेले तरी वेळेची जवळपास अर्ध्या तासांनी बचत होत असल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाळधी ते तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गाचे काम पूर्णत्वास येण्यासाठी बराच काळ लागला असला, तरी आता या महामार्गामुळे प्रवाशांना आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळत आहे. या मार्गाचा लाभ थेट हजारो नागरिकांना होत आहे. पूर्वी पाळधीहून तरसोदकडे जाण्यासाठी वाहनचालकांना जळगाव शहरातील जुन्या महामार्गावरून प्रवास करावा लागे. त्यामुळे किमान पाऊण तासाचा वेळ खर्च होत असे. मात्र, बाह्यवळण महामार्ग सुरू झाल्यापासून हा प्रवास केवळ २० मिनिटांत पूर्ण होऊ लागला आहे.

बाह्यवळण महामार्गामुळे इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचत असून, वाहनधारकांच्या वेळेची सुद्धा बचत होत आहे. दररोज धावणाऱ्या हजारो वाहनांची वर्दळ कमी झाल्यानंतर शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. वाहतूक कोंडीचा त्रास कमी झाल्याने तसेच अपघातांचे प्रमाण घटल्याने नागरिक निर्धास्तपणे प्रवास करू लागले आहेत.

बाह्यवळण महामार्गाच्या कामांचा दर्जाही चांगला असल्याने प्रवाशांना सुखद प्रवासाचा अनुभव येत आहे. या सुविधेमुळे व्यापारी, शेतकरी, नोकरदार तसेच विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाला आहे. मुख्य महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर आव्हाणे, ममुराबाद, आसोदा, तरसोद येथील उड्डाणपुलांच्या खालून जाणारे ग्रामीण भागातील रस्ते आता बाह्यवळण महामार्गाशी जोडले जात आहेत.

भुसावळ किंवा एरंडोल-धरणगावकडे जाण्यासाठी कमी अंतराची सोय त्यामुळे संबंधित सर्व गावातील नागरिकांची झाली आहे. जुन्या महामार्गाने जळगाव शहरापासून भुसावळचे अंतर साधारणपणे २७ किलोमीटर इतके आहे. तेवढेच अंतर बाह्यवळण महामार्गावरील ममुराबाद उड्डाणपुलापासून देखील आहे. वाहनधारकांना जळगाव शहरातून भुसावळ जाण्यासाठी किमान ५० मिनिटे लागतात. मात्र, बाह्यवळण महामार्गावरून तेवढेच अंतर कापण्यासाठी आता फक्त अर्धा तास लागतो.

इंधन खर्चाची मोठी बचत

जुन्या महामार्गावरून गेल्यास जळगाव ते धुळे दरम्यानचे अंतर ९५ किलोमीटर भरते. वाहनांना बाह्यवळण महामार्गावरूनही धुळ्यासाठी तितकेच अंतर कापावे लागत आहे. मात्र, जळगाव शहरातील वाहतूक कोंडीतून धुळे जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत आता अर्ध्या तासांनी बचत होत आहे. विशेष म्हणजे महामार्गावरून भुसावळ किंवा धुळे जात असताना, शहरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना खर्च होणाऱ्या इंधनाची मोठी बचत आता शक्य झाली आहे.