नाशिक : शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर अपघाताची टांगती तलवार ठेवणारी झाडे त्वरीत हटवावीत, या मागणीसाठी शहरातील विविध संघटना पुन्हा नाशिक सिटीझन्स फोरम अर्थात ‘एनसीएफ’च्या पुढाकाराने हाती घेण्यात आलेल्या ‘झाडे हवीत, पण रस्त्यामध्ये नकोत’ या मोहिमेंतर्गत एकवटल्या आहेत. याबाबत ११ प्रमुख संघटनांची पत्र महानगरपालिकेकडे सादर करण्यात आली. रस्त्यांवरील अपघातप्रवण व जीवघेण्या झाडांच्या समस्येबाबत ‘एनसीएफ’ने ऑनलाईन स्वाक्षरी मोहिमदेखील हाती घेतली असून त्यात आजवर शेकडो नाशिककरांनी सहभाग नोंदवला आहे.

धोकादायक झाडांच्या समस्येविरोधात नाशिक सिटीझन्स फोरम पाठपुरावा करत आहे. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यातही विविध संघटनांच्या सहकार्याने ‘एनसीएफ’ने महानगरपालिकेकडे धोकादायक झाडे हटविण्याची मागणी करणारी पत्र सादर केली होती. मात्र, अद्यापही धोकादायक व अपघातप्रवण झाडे पूर्णतः हटवली गेलेली नाहीत. यामुळे ‘एनसीएफ’ने पुन्हा एकदा निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडीयन मेडीकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ नाशिक स्कूल्स, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक बार असोसिएशन, क्रेडाई-नाशिक मेट्रो, नरेडको, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक, नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना यांची धोकादायक झाडे हटविण्याची मागणी करणारी पत्र महानगरपालिकेकडे सादर केली आहेत.

या संघटनांच्या पत्रांसोबत ‘एनसीएफ’ने दिलेल्या पत्रात धोकादायक झाडे हटवण्यासाठी कालबद्ध मोहिम हाती घ्यावी, गरज भासल्यास झाडांचे पुर्नरोपण करावे, धोकादायक झाडे, खांब हटविल्याशिवाय रस्ते रुंदीकरणाच्या कामाला पूर्णत्वाचा दाखला देऊ नये असा आग्रह धरण्यात आला आहे. ज्या झाडांवर लोकांचे बळी गेले आहेत आणि जिथे अपघाताच्या शक्यता अधिक आहेत, अशा काही झाडांजवळ वाहनचालकांना सावध करणारे फलकही ‘एनसीएफ’ने लावले आहेत. तसेच चेंजडॉटओआरजी या संकेस्थळावर ऑनलाईन याचिका दाखल करून ‘ऑनलाईन स्वाक्षरी मोहिमही सुरू केली आहे. खासगी शाळांच्या संघटनेने धोकादायक झाडे काढण्याच्या बदल्यात आपापल्या परिसरात वृक्षारोपण मोहिम हाती घेण्याची तयारी दर्शवली आहे. गरज भासल्यास काही झाडांचे पुर्नरोपण करण्यासाठी आवारात जागा देण्याची तयारीही काहींनी दाखवली आहे.

रस्त्यांमधील झाडे अपघातप्रवण बनली आहेत. पेठ, दिंडोरी, नाशिकरोड, गंगापूर रोड अशा प्रमुख रस्त्यांप्रमाणेच अन्य रस्त्यांवरही धोकादायक झाडांची समस्या आहे. या झाडांवर वाहने धडकून झालेल्या मृत्यूंबाबत ‘एनसीएफ’ने गतवर्षी सर्वेक्षण केले होते. त्यानुसार पाच वर्षांत सुमारे ४० नागरीकांना प्राण गमवावे लागल्याचे निदर्शनास आले.

उत्तम हवामान हे नाशिकचे वैशिष्ठ्य आहे. ते कायम ठेवण्यासाठी प्रयत्नही होत आहेत. ते झाले पाहिजेत. पण, काही मोजक्या झाडांमुळे लोकांना प्राणास मुकावे लागत असेल, त्यांची कुटूंबे उजाड होत असतील तर मग सर्वांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे. ‘एनसीएफ’ने तशी भूमिका घेतली आणि तिला शहरातील अग्रणी संघटनांनी पाठिंबाही दिला. या प्रश्नावर वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजेही ठोठवावे लागतील. – आशिष कटारीया (अध्यक्ष, नाशिक सिटीझन्स फोरम)