नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत गुंतलेल्या नाशिक नगरीत हत्या, प्राणघातक हल्ले, टोळक्यांचा धुडगूस, लूटमार, वाहनांची तोडफोड, सोनसाखळी खेचून नेणे आदी गुन्हेगारी घटनांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत २५ हत्यांची नोंद झाली. एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना, दुसरीकडे पोलीस यंत्रणेचा कोणताही धाक राहिला नसल्याचाच हा परिणाम असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

काही वर्षांपूर्वी राजकीय वरदहस्तामुळे नाशिकमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावली होती. अनेक भागात टोळ्या निर्माण झाल्या होत्या. वर्चस्ववादातून त्यास टोळी युद्धाचे स्वरुप प्राप्त झाले होते. आता पुन्हा शहराची त्याच दिशेने वाटचाल सुरू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

प्रेम प्रकरणाच्या संशयावरून सातपूर भागात युवकाची हत्या झाली होती. पाठोपाठ बुधवारच्या आठवडी बाजारात वडिलांच्या खिशातून पैसे हिसकावणाऱ्या टोळक्याला विरोध केल्याने १९ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. काही प्रकरणांत पोलीस तत्परतेने गुन्हेगारांना जेरबंद करतात. मात्र गुन्हेगारी आटोक्यात येत नसल्याची स्थिती आहे.