नाशिक : सुरगाणा शहरात बंद घरे आणि दुकाने फोडण्याची मालिका सुरू आहे. चोरटय़ांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. परगावी जातांना काय खबरदारी घ्यावी याबाबत पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही दुर्लक्ष केले जात आहे. याचा परिणाम म्हणून चोरटे सहजपणे बंद घरे, दुकाने फोडत आहेत. त्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे आहे.
सुरगाणा शहरातील मुख्य बाजारपेठेतील भ्रमणध्वनी विक्रेते अजिंक्य आहेर यांच्या घरी मध्यरात्रीस चोरी झाली. अजिंक्य यांचे कुटुंबीय जळगाव येथे बुधवारी सकाळी गेले. गुरुवारी परत आल्यावर घराच्या मागील बाजूच्या शटरचे कुलूप तोडलेले दिसून आले. चोरांनी शटरचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोख रक्कम तीन लाख पंचाहत्तर हजार रुपये आणि दागिने असा एकूण सहा लाख १५ रुपयांचा ऐवज चोरून नेला. जास्त असलेली चिल्लर आणि चांदीच्या काही वस्तू न नेता रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले.
जेथे चोरी केली त्या खोलीच्या पुढील भागात असलेल्या आहेर यांच्या भ्रमणध्वनीच्या दुकानात मात्र चोरटय़ांनी प्रवेश केला नाही. दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आला असल्याची माहिती बहुधा त्यांना असावी.
पोलिसांच्या गस्तीविषयी नागरिक साशंकता व्यक्त करत आहेत. पोलिसांच्या गस्तीअभावी काही प्रमाणांत गुन्हे घडत असले तरी नागरिकांचा बेजबाबदारपणाही कारणीभूत ठरत आहे. घर किंवा दुकान बंद करून परगावी जाताना जवळचे पोलीस ठाणे, शेजाऱ्यांना कळवून गेले पाहिजे; परंतु तसे होत नाही. सुरक्षा साधनांचा वापर केला जात नाही. दागिने, रोकड, बँकेत ठेवण्यात येत नाही.
नागरिकांनी दक्षता घ्यावी
पोलीस प्रत्येक घरासमोर गस्त घालू शकत नाही. सर्व भागांत गस्त सुरू असते. नागरिकांची दक्षतादेखील आवश्यक आहे. सुरक्षा साधनांचा वापर करावा. परगावी जाताना दागिने, रोकड बँकेत ठेवावी. सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. दरवाजाचे कडी-कोयंडे स्टीलचे बसवावेत, यासह अन्य दक्षता घ्या.
– दिवाणसिंग वसावे (पोलीस निरीक्षक, सुरगाणा)