लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : मौनी अमावास्येनिमित्त बुधवारी गोदावरी नदीत स्नानाचा योग साधण्यासाठी भाविकांची दिवसभर मोठी गर्दी उसळली होती. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात हा शाही पर्वणीचा दिवस होता. त्या ठिकाणी स्नानासाठी जाऊ न शकलेल्या भाविकांनी गोदावरीत डुबकी मारुन समाधान मिळविले.

सकाळपासून रामकुंड आणि गोदावरी काठाकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांनी भरून गेले होते. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी रामकुंड परिसराकडे जाणारे रस्ते लोखंडी जाळ्या लावून बंद केले होते. भाविकांना वाहने नेण्यास प्रतिबंध करण्यात आला. दूरवर वाहने उभी करून भाविकांना पायी गोदावरी काठाकडे जावे लागले. बुधवारी गोदाकाठावर भाजी बाजार भरतो. या ठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. बाजार परिसरातही वाहने उभी करण्यात आली होती.

सूर्य मकर राशीत असल्याने या काळात आलेल्या मौनी अमावास्येनिमित्त रामकुंडावर स्नानासाठी गर्दी होणार असल्याची पूर्वकल्पना पुरोहित संघाने आठ दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला दिली होती. गोदावरी प्रवाही राखण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आल्याचे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले. तथापि, धरणातून पाणी सोडले की नाही, याची स्पष्टता झाली नाही.

देशात चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात मौनी अमावास्येनिमित गंगातीरी शाही स्नानाचे आयोजन करण्यात आले होते. अनेकांना कुंभमेळ्यात सहभागी होणे शक्य नव्हते. अशा भाविकांनी याच दिवशी कुंभमेळा भरणाऱ्या नाशिकमध्ये गोदावरी नदीत स्नानाचा योग साधला. भल्या सकाळपासून भाविकांचे जथ्थे रामकुंडाकडे जाऊ लागले होते. नंतर चांगलीच गर्दी झाली.

प्रगागराजला गेलेले ४१ भाविक सुखरुप

मौनी अमावास्येनिमित्त प्रयागराज येथे शाही स्नान करण्यासाठी संगम घाटावर गर्दी उसळल्यानंतर चेंगराचेंगरी होऊन काही भाविकांचा मृत्यू झाला. प्रयागराजला स्नानासाठी गेलेले नाशिकचे भाविक सुखरूप असल्याची माहिती चौधरी यात्रा कंपनीने दिली. देशातील सर्वात मोठ्या कुंभमेळ्यात शाही पर्वणीचा योग साधण्यासाठी चौधरी यात्रा कंपनीतर्फे ४१ भाविक प्रयागराजला गेले आहेत. हे सर्व भाविक सुखरुप असल्याची माहिती कंपनीचे संचालक सत्यनारायण चौधरी यांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crowd of devotees take bath in ramkund due to mauni amavasya mrj