जळगाव : खान्देशातील केळीला श्रावण महिन्यामुळे उत्तर भारतातून काही दिवसांपासून चांगली मागणी असताना, गुजरात राज्यातील केळीही आता तिकडच्या बाजारपेठेत पोहोचली आहे. प्रत्यक्षात, गुजरात स्पर्धेत असल्यानंतरही खान्देशातील केळी निव्वळ गुणवत्तेमुळे आपला दबदबा कायम राखून आहे. बाजारातील वाढत्या स्पर्धेचा केळी दरावर फार मोठा परिणाम न झाल्याने उत्पादकांनाही दिलासा मिळाला आहे.

जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या नवती केळीची काढणी सध्या वेगाने सुरू असून, बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, एकट्या बऱ्हाणपूर बाजार समितीत सद्यःस्थितीत २५० ते ३०० गाडी आणि इतर भागातून १२५ ते १५० गाडी केळीची आवक दररोज होत आहे. राजस्थानसह दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशात १५ दिवस आधीच सुरू झालेल्या श्रावण मासामुळे केळीला आतापर्यंत बऱ्यापैकी मागणी होती. बाजारात सध्याच्या घडीला इतर कोणत्याही हंगामी फळांची उपलब्धता नसल्याने उत्तरीय राज्यांमध्ये यापुढील काळातही केळीला मागणी कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या कारणाने आवक वाढल्यानंतरही केळीच्या भावावर म्हणावा तसा लक्षणीय परिणाम दिसून आलेला नाही.

बऱ्हाणपूरमध्ये महिनाभरापूर्वी दररोज १८० ते २०० गाडी केळीची आवक दिसून येत होती. आवक कमी असल्याने केळीला त्या वेळी २५०० रूपये प्रति क्विंटलपर्यंत भावही मिळत होता. मात्र, खान्देशसह बऱ्हाणपूरलगतच्या भागातून केळीची मोठ्या प्रमाणात काढणी सुरू झाल्याने बऱ्हाणपुरात आता आवकेत अचानक मोठी वाढ झाल्याने केळीचे भावही काही प्रमाणात खाली आले आहेत. तरीही बऱ्हाणपुरात प्रति क्विंटल १७०० रूपयांपर्यंत भाव केळीला मिळत आहे. दुसरीकडे, रावेरमध्येही नवती केळीला १९०० ते २१०० रूपये प्रति क्विंटलचा भाव आहे. दरम्यान, गुजरात राज्यातील सुरतसह राजपिपला, आनंद, कामरेज भागातूनही आता नवती केळीची जोरदार आवक सुरू झाली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने विचार करता खान्देशातून राजस्थानमध्ये रस्ते मार्गे केळी पाठवायची झाल्यास १८ ते २० तास लागतात. त्याच वेळी गुजरातमधून निघालेली केळी राजस्थानात १२ तासातच पोहोचत आहे.

उत्तर भारतातील व्यापारी गुजरातमधील केळीला त्यामुळे बरेच प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परिणामी, खान्देशात उत्पादित होणाऱ्या केळीसमोर मोठे आव्हान देखील उभे राहिले आहे. केळी भाव सुद्धा काहीअंशी दबावातच आहेत. अशाही परिस्थितीत निव्वळ मालाची गुणवत्ता चांगली असल्याने खान्देशातील केळी उत्तर भारतात आपला दबदबा कायम राखून आहे. चोपडा (जि. जळगाव) येथील वामनरावभाऊ पाटील सहकारी फळ विक्रेता सहकारी संस्थेचे सचिव मुकेश पाटील यांनीही त्यास दुजोरा दिला. बाजारातील सद्यःस्थितीचा अंदाज घेऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जास्त जोखीम न पत्करणे योग्य राहील, असेही त्यांनी नमूद केले.