धुळे : “दिव्यांग असलो म्हणून काय झाले, आम्हीही यशस्वी उद्योजक बनू शकतो”, असा आत्मविश्वास जिल्ह्यातील दिव्यांग युवकांमध्ये दृढपणे निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे जिल्हा आता राज्यातील आदर्श मॉडेल म्हणून पुढे येत आहे. दिव्यांग सक्षमीकरणात धुळे जिल्ह्याने अलीकडच्या काळात उल्लेखनीय प्रगती साधली असून दिव्यांग रोजगार, कौशल्य विकास, उद्योजकता प्रोत्साहन, यूडीआयडी नोंदणी आणि जनजागृती मोहिम अशा क्षेत्रांमध्ये जिल्हा आता राज्यातील आदर्श मॉडेल म्हणून पुढे येत आहे. जिल्ह्यातील अनेक दिव्यांग युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून यामागे जिल्हा प्रशासन आणि युथ फॉर जॉब्स अकादमीचे संयुक्त प्रयत्न निर्णायक ठरले आहेत.

वित्तीय वर्ष २०२५–२६ च्या पहिल्या तिमाहीत धुळे जिल्ह्यात यूडीआयडी नोंदणी शंभर टक्के पूर्ण करण्यात आली. दिव्यांग जनजागृतीसाठी जिल्ह्यातील एकूण ३९ गावांमध्ये २८८८ उपक्रम राबविण्यात आले. या मोहिमेद्वारे ७२२ युवकांना कौशल्य प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले, ११० युवकांचे समुपदेशन झाले आणि ३७ युवकांना प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. यापैकी १७ युवकांना त्वरित रोजगार मिळाला ही मोहिमेची मोठी उपलब्धी मानली जाते. तसेच सूक्ष्म उद्योजकता प्रशिक्षण घेतलेल्या सहा युवकांपैकी तीन युवकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला असून त्यांना एक लाख २० हजार रुपयांचे वित्तीय सहाय्य मिळाले. या सर्व उपक्रमांमधून घडलेली यशस्वी दिव्यांगांची उदाहरणे जिल्ह्यात सकारात्मक परिवर्तनाची दिशा स्पष्ट करतात.

शिरपूर तालुक्यातील अजंदे गावातील राजेंद्र चव्हाण (वय ३२ वर्षे ) डाव्या पायाने दिव्यांग असूनही कौशल्य प्रशिक्षणामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. संगणक साक्षरता आणि वर्तन विकास यामुळे त्याची संगणक ऑपरेटर म्हणून निवड झाली. आज तो वार्षिक एक लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून कुटुंबाचा आधार बनला आहे. दुसरे उदाहरण धुळे शहरातील आहे. संभाजी सोनवणे (वय ३६ वर्षे ) यांनी उद्योजकता प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या सायबर केंद्रात नव्या सेवा सुरू केल्या. ग्राहक संवाद, डिजिटल साक्षरता आणि आर्थिक नियोजन या कौशल्यांमुळे त्यांच्या व्यवसायात वाढ झाली. सध्या त्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख चार हजार रुपयांपर्यंत पोहोचले असून ते स्वावलंबनाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. धुळे जिल्ह्याचा हा दिव्यांग सक्षमीकरण उपक्रम कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेच्या संधी वाढविण्याचे प्रभावी साधन ठरत असून राज्यभरात या मॉडेलचे कौतुक होत आहे.

दिव्यांग युवकांच्या प्रगतीसाठी जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये कुटुंबांची मानसिकता बदलण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. अनेक कुटुंबांमध्ये दिव्यांगत्व म्हणजे मर्यादा अशी धारणा होती. मात्र जनजागृती उपक्रम, समुपदेशन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून ही मानसिकता बदलू लागली आहे. कौशल्य मिळाल्यावर रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, हा विश्वास दृढ होत असून कुटुंबीय आता मुलांना प्रशिक्षण आणि उद्योजकता उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करू लागले आहेत. यामुळे दिव्यांग युवकांच्या जीवनात स्वाभिमान, स्थैर्य आणि सामाजिक स्वीकृतीची भावना आणखी बळकट होत आहे.

धुळे जिल्ह्यातील हा उपक्रम इतर जिल्ह्यांसाठी दिशा दाखवणारा ठरत असून राज्य सरकारही या मॉडेलचा अभ्यास करण्याच्या तयारीत आहे. युथ फॉर जॉब्स अकादमी आणि प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे येत्या काळात रोजगार संधी, सूक्ष्म उद्योजकता, डिजिटल कौशल्ये आणि वित्तीय सक्षमीकरण या क्षेत्रांत आणखी मोठ्या प्रमाणावर काम होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दिव्यांगांना सामाजिक-आर्थिक मुख्य प्रवाहात आणण्याचे ध्येय साध्य करण्यात धुळे जिल्हा सातत्याने पुढाकार घेत असून हा परिवर्तनाचा प्रवास पुढील काही वर्षांत अधिक व्यापक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.