धुळे : गुन्हे तपासासाठी आधुनिक मोजमाप संकलन कक्ष सुरू झाला असून या ठिकाणी जिल्ह्यातल्या २७० आरोपींच्या बोटांचे आणि तळहातांचे ठसे, छायाचित्रे, डोळ्यांचे बुबुळ आणि रेटीनाचे स्कॅन तसेच जैविक नमुने संकलित करण्यात आले आहेत.यातून मोजमाप संकलित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे अटक झालेल्या किंवा दोषी ठरलेल्या व्यक्तींची नोंद भविष्यातील तपासात उपयुक्त ठरणार आहे असा दावा पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे कामकाज सुरू आहे.

केंद्र सरकारने कैद्यांची ओळख कायदा १९२० रद्द करून २०२२ मध्ये सुधारित फौजदारी प्रक्रिया (ओळख) कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार गुन्हेगारी प्रकरणांतील आरोपींची ओळख पटवणे, तपास करणे, नोंदवही ठेवणे आणि त्यासंबंधी माहिती संकलित करण्यासाठी पोलिस व तुरुंग अधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. या उद्देशाने जिल्हास्तरावर धुळे येथे १० जुलै २०२५ रोजी मोजमाप संकलन कक्ष (मेजरमेंट कलेक्शन युनिट) स्थापन करण्यात आले आहे. तेव्हापासूनच कार्यान्वित झालेल्या या युनिटमध्ये एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस अमलदार यांची स्वतंत्र नेमणूक करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक हे या कक्षाचे समन्वय अधिकारी आहेत. या कायद्यानुसार आरोपींच्या मोजमापामध्ये त्यांच्या बोटांचे आणि तळहातांचे ठसे, छायाचित्रे, डोळ्यांचे बुबुळ आणि रेटीनाचे स्कॅन तसेच जैविक नमुने संकलित करणे यांचा समावेश आहे.

संकलित झालेली ही माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या निर्देशानुसार सुरक्षितपणे जतन केली जाते आहे. कक्षातील अधिकारी व अमलदारांना नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो आणि सी-डॅक यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या या कक्षात आरोपींच्या छायाचित्रे, बुबुळ व रेटीनाचे स्कॅन तसेच जैविक माहिती क्राइम प्रोसेसिंग इंटरफेस या प्रणालीत संकलित करून अपलोड करण्याचे काम सुरु आहे अशी माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अटक झालेल्या किंवा दोषी ठरलेल्या व्यक्तींची नोंद भविष्यातील तपासात उपयुक्त ठरणार आहे. बायोमेट्रिक माहिती आणि फोटोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांची अचूक ओळख पटविणे आता सुलभ झाले आहे. या कक्षाच्या माध्यमातून १० जुलै २०२५ पासून ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत धुळे जिल्ह्यातील एकूण ५४६ पैकी २७० आरोपींचे मोजमाप संकलित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गुन्हेगारी प्रकरणांतील अटक आरोपींचे मोजमाप घेण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व सूचना देण्यात येत आहेत.

या अत्याधुनिक यंत्रणेमुळे गुन्हे तपास प्रक्रियेला गती मिळत असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोपींची ओळख अधिक अचूक आणि विश्वसनीय पद्धतीने निश्चित करणे शक्य झाले आहे. धुळे जिल्ह्यात सुरू झालेल्या या उपक्रमामुळे महाराष्ट्र राज्यात गुन्हे तपास आणि ओळख प्रणालीत नवे परिवर्तन घडून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.