जळगाव – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शंभर वर्षे जुनी दगडी इमारत विकण्यास काढल्याने आधीच मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता बँकेच्या अध्यक्षांनी त्यांच्या अख्त्यारितील जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशनची इमारत विकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ज्यामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. 

जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी १९४८ मध्ये पूर्व खान्देश डिस्ट्रीक्ट को-ऑफ सेल-परचेस संस्थेची स्थापना सहकार क्षेत्रातील काही धुरिणांनी केली होती. तत्कालीन अध्यक्ष रामराव पाटील, दामू पाटील, उदयसिंग पवार आदींनी संस्थेला नंतर प्रगतीपथावर नेण्याचे काम केले. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून स्थापन झालेल्या सदर संस्थेचे कालांतराने जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशन, असे नामकरण केले गेले. जळगाव शहरातील जिल्हा पेठ भागातील गांधी नगरात सुमारे दोन हजार चौरस फूट जागेवर संस्थेची दुमजली इमारत उभारण्यात आली. हीच इमारत विकण्याचा प्रस्ताव आता विद्यमान अध्यक्ष संजय पवार यांच्यासह संचालक मंडळाने जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविला आहे. पवार हे जिल्हा सहकारी बँकेचेही अध्यक्ष आहेत.

दरम्यान, जिल्हा उपनिबंधकांनी सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशनची इमारती विक्री काढण्यासाठी दाखल प्रस्तावाला परवानगी अद्याप दिलेली नाही. संस्थेची बाजारात येणे बाकी रक्कम किती आहे, संचालक मंडळाने इमारत विकण्यासाठी बहुमताने ठराव केला आहे का, असे अनेक प्रश्न उपनिबंधकांनी उपस्थित केले आहेत. प्राप्त माहितीनुसार, कॉटन मार्केटिंग फेडरेशनवर एचडीएफसी बँकेचे सुमारे दीड कोटींचे कर्ज थकीत आहे. कर्जासह व्याजाची रक्कम भरणे जड जात असतानाच संस्थेच्या आठ कर्मचाऱ्यांचे गेल्या आठ महिन्यांपासून पगार झाले नसल्याचे सांगितले जाते.

संस्थेकडून विविध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक खते खरेदी केली जातात. आणि जिल्हाभरातील विकास सोसायट्या, कृषी केंद्रांना पुरविली जातात. मात्र, रासायनिक खते विकली गेल्यानंतर त्यांची देयके वेळेवर वसूल न झाल्याने २.५ कोटींहून अधिक रकमेचा बोजा कॉटन मार्केटिंग फेडरेशनवर येऊन पडल्याची माहिती मिळाली आहे. आर्थिक स्थिती खालावल्यानंतर पैसे वेळेवर मिळत नसल्याने संस्थेला आता कोणतीच कंपनीने उधारीने माल देत नाही. पूर्वी ७० ते ८० हजार टनाने होणारी खत विक्री दोन हजार टनापर्यंत खाली आहे. आर्थिक उलाढाल कमी झाल्याने संस्थेच्या नफ्याचे गणितही अलिकडे बिघडले आहे. त्यातून मार्ग काढण्यात अपयशी ठरलेल्या संचालक मंडळाने त्यामुळे थेट संस्थेची इमारत विक्रीला काढल्याने शेतकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

संस्थेवर एचडीएफसी बँकेचे कर्ज आहे. खतांच्या विक्रीनंतर येणे बाकी असलेली बरीच रक्कम अनेक वर्षांपासून थकली आहे. त्यामुळे इमारत विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. –संजय पवार (अध्यक्ष- जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशन)

जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशनने त्यांची इमारत विक्री करण्याची परवानगी मागितली आहे. मात्र, प्रस्तावात बऱ्याच त्रूटी असल्याने त्याची परवानगी नाकारली आहे. –गौतम बलसाणे (जिल्हा उपनिबंधक, जळगाव)