नाशिक – सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथील हत्येचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. मद्यपी पतीच्या त्रासाला वैतागून महिलेने हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. सुरगाणा पोलीस ठाण्यात यशवंत ठाकरे (४२, मालगोंदा, ता. सुरगाणा) हे दोन महिन्यांपासुन बेपत्ता झाले असल्याची तक्रार त्यांचे वडील मोहन ठाकरे यांनी दिली होती.

या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरु केला होता. तपासादरम्यान पथकाला काही माहिती मिळाली. हरवलेल्या व्यक्तीची पत्नी प्रभावती ठाकरे ही पती बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांपासून मजुरीसाठी बिलीमोरा (गुजरात) येथे गेली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अंमलदारांनी बिलीमोरा गावी जाऊन प्रभावती यांना विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली.

१४ एप्रिल रोजी दुपारचे सुमारास यशवंत ठाकरे हा मद्यप्राशन करून घरी आला. प्रभावतीने जेवण वाढून दिले असता त्याने जेवण फेकून दिले. काही कारण नसतांना प्रभावतीला शिवीगाळ आणि मारहाण केली. यशवंतने प्रभावतीचा गळा दाबला, तेव्हा प्रभावतीने घराचे पडवीतील कु-हाडीने यशवंतच्या डोक्यात प्रहार केला. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. त्यानंतर यशवंतने आता मी तुला मारूनच टाकतो, असे धमकावल्याने प्रभावतीने हातातील कु-हाडीने त्याच्या मानेवर घाव घातल्याने प्रभाकरचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रभावतीने भीतीमुळे यशवंतचा मृतदेह घराच्या पडवीच्या बाजूस शौचालयासाठी खोदून ठेवलेल्या खड्डयात पुरून, त्यावर आजुबाजूचा कचरा व माती टाकून तो बुजवला. त्यावर लाकूड रचून ठेवले. सर्व पुरावे नष्ट केले.

त्यानंतर दोन दिवसांनी यशवंतचे वडील मोहन ठाकरे हे घरी आले असता, त्यांना यशवंत हा कामासाठी गुजरात राज्यात गेल्याचे सांगितले. तिचा मुलगा हादेखील त्याच्या मामाच्या घरी बिलीमोरा येथे गेला असल्याने हत्येविषयी कोणालाही संशय आला नाही. प्रभावतीच्या कबुलीनंतर प्रभावती ठाकरे हिस सुरगाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.