नाशिक : गौण खनिज तपासणीदरम्यान पथकाला दमदाटी करीत त्यांच्या अंगावर मालमोटार घालण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली. संशयित चालक नंतर मालमोटार घेऊन पसार झाला. या घटनेने शहर व ग्रामीण भागातील गौण खनिजचे अवैध उत्खनन आणि होणाऱ्या वाहतुकीवर नव्याने प्रकाश पडला आहे.
म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रस्त्यावर ही घटना घडली. घटनास्थळापासून म्हसरूळ पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर आहे. या बाबत मंडळ अधिकारी रामसिंग परदेशी यांनी तक्रार दिली. गौण खनिज तपासणीसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार मंडळ अधिकारी रामसिंग परदेशी, त्यांच्या पथकातील सहकारी शरद गोसावी व नामदेव पवार हे गुरूवारी दुपारी साडेतीन वाजता म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रस्त्यावर कारवाई करण्यासाठी थांबलेले होते. यावेळी कन्सारा माता चौकाकडून मालवाहू गाडी आली. पथकाने तिला थांबवून कागदपत्रे, गौण खनिज वाहतूक परवाना दाखविण्याची सूचना केली. त्यावेळी चालकाने अरेरावीची भाषा केली.
तुम्ही कोण मला थांबविणारे असा प्रश्न करीत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून दोन साथीदारांना बोलावून घेतले. यातील एकाने गाडी चालकास खाली उतरवत पथकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. शासकीय काम करू नये या उद्देशाने संशयिताने आमच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करीत मालमोटार भरधाव वेगात पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात सरकारी कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन मंद्रुपकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन, नदीपात्रातून अनधिकृतपणे होणारा वाळुचा उपसा आणि अवैध वाहतुकीचा विषय नेहमी चर्चेत असतो. या अनुषंगाने वारंवार तक्रारी होतात. वाळू, गौण खनिज माफिया कुणालाही जुमानत नाही. तपासणी पथकाच्या अंगावर मालमोटार घालण्याचा प्रयत्न करीत वाहन पळवून नेण्याच्या घटनेतून ही बाब पु्न्हा समोर आली आहे. अवैध गौण खनिज उत्खनन आणि अवैध वाळू उपसा व वाहतुकीचे प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज वारंवार व्यक्त केली जाते. महसूल यंत्रणेकडून अधुनमधून कारवाई केली जाते. परंतु, तस्करीचे हे प्रकार अव्याहतपणे सुरू असल्याचे विविध घटनांमधून समोर येते. ग्रामीण भागाप्रमाणे शहरातही दादागिरी करण्यापर्यंत तस्करांची मजल गाठल्याचे उपरोक्त घटनेतून दिसत आहे.
