मालेगाव : अलीकडेच नाशिकचे वादग्रस्त सुधाकर बडगुजर यांना प्रवेश दिल्यानंतर आता येथील व्यंकटेश सहकारी बँकेत घोटाळा केल्याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेले संशयित माजी आमदार अपूर्व हिरे यांनी मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. हिरे हे गेल्या विधानसभा निवडणुकीनंतरशिवसेना ठाकरे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात दाखल झाले होते. याआधीही हिरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ३० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

अपूर्व हिरे, त्यांचे वडील माजी मंत्री प्रशांत हिरे व शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते असलेले त्यांचे कनिष्ठ बंधू अद्वय हिरे यांच्या विरोधात दोन कोटी १४ लाखाचा अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हिरे कुटुंबियांशी संबंधित शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने व्यंकटेश बँकेत बोगस कर्ज प्रकरणे करून ही रक्कम लाटल्याचा संशय आहे. ही बँक देखील हिरे कुटुंबियांशी संबंधित आहे. हिरे यांच्या शिक्षण संस्थेतीलच शिक्षक विलास पगार यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे.

या बँकेत आपल्या नावाने १४ लाखाचे कर्ज प्रकरण परस्पर करण्यात आले. त्यासाठी आपली कोणतीही मालमत्ता तारण देण्यात आली नव्हती. सुट्या धनादेशाच्या माध्यमातून बनावट स्वाक्षरी करून ही रक्कम लाटण्यात आली. तसेच ही रक्कम तीन लोकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली. इतकेच नव्हे तर, आपण तक्रार केल्यावर या कर्जाची परस्पर एकरकमी फेड करण्यात आल्याचे पगार यांनी म्हटले आहे.

आपल्याप्रमाणेच अन्य २४ कर्मचाऱ्यांच्या नावाने परस्पर बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आल्याचेही पगार यांनी तक्रारीत नमूद केले आहे. यापूर्वी देखील हिरे कुटुंबियांशी संबंधित शिक्षण संस्थांमध्ये फसवणूक झाल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. यामुळे हिरे कुटुंबीय आधीच अडचणीत असताना नव्याने आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अपूर्व हिरे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.