नाशिक – नाशिकमार्गे गुजरातच्या दिशने निघालेल्या दहा चाकी कंटेनरमधून उत्पादन शुल्क विभागाने कंटेनरसह तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नाशिकजवळील पळसे येथे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक एकने केली.

मांगीलाल रामकिसन (३०, रा.बारनेर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. गोवानिर्मीत मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथक क्रमांक एकने बुधवारी रात्री नाशिकसजवळील शिंदे, पळसे येथे तळ ठोकला. पहाटेच्या सुमारास दहाचाकी कंटेनर अडवून पथकाने तपासणी केली असता त्यात बनावट मद्याचे दोन हजाराहून अधिक खोके आढळून आले. कारवाईत कंटेनरसह मद्यसाठा असा दोन कोटी २६ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवानिर्मित मद्यसाठ्याची नाशिकमार्गे गुजरात राज्यात तस्करी केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

अधिक तपास दुय्यम निरीक्षक गणेश नागरगोजे करीत आहेत. ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त उषा वर्मा, अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे निरीक्षक विलास बामणे, दुय्यम निरीक्षक गणेश नागरगोजे,संजय सावंत, सहायक दुय्यम निरीक्षक पी. वाय. गायकवाड जवान दिपक आव्हाड, अमित गांगुर्डे, संदिप देशमुख, व्ही.ए.चव्हाण, सागर पवार, अमन तडवी, तसेच अनिता भांड आदींनी केली.