नाशिक : दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगार आणि एक विधीसंघर्षित बालक यांच्या ताब्यातून १५ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. अंदाजे १० लाख ४० हजार रुपयांचा हा मुद्देमाल आहे.शहर परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्याअंतर्गत बऱ्याचदा घरासमोर लावलेली, वाहनतळ परिसरात लावलेली वाहने चोरली जात आहेत. वाहन चोरीच्या वाढत्या संख्येमुळे पोलिसांनी कार्यवाहीला सुरूवात केली आहे. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने पथके तयार करण्यात आली आहेत.
पंचवटीतील निलगिरी बाग परिसरात सत्यम उर्फ देवा गरूड (२१, रा. ओझर), साहिल शेख (२१, रा. दहावा मैल) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातील चोरीच्या १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांनी विधीसंघर्षित बालक तसेच खेड येथील विकास कुमावत याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे.
नाशिक शहर परिसरात वाहन चोरीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. जूनमध्ये शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या द्ददीतून ७४ वाहन चोरीची प्रकरणे घडली होती. शहर परिसरातील तसेच इतर राज्यातील, जिल्ह्यातील चोरांकडून प्रारंभी हेरगिरी करण्यात येते. रस्त्याच्या बाजूला लावलेली, वाहनतळ परिसरात कोपऱ्यात लावलेली वाहने अधिक प्रमाणात चोरांचे लक्ष्य बनतात. चोरांमध्ये तरूण मुलांचा सहभाग वाढत आहे. समाजमाध्यमातील माहितीचा वापर करत वाहनांची कुलूपे कशी तोडायची, याचा अभ्यास करुन वाहने पळवली जात आहेत. वाहन चोरी प्रामुख्याने चैन, मौजमजेसाठी होत आहेत.