लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : खंडणीखोर वैभव देवरेविरूध्द असणाऱ्या तक्रारी दिवसागणिक वाढत असतांना त्याची दहशत कमी व्हावी, यासाठी त्याची परिसरातून धिंड काढण्यात आली. गुरूवारी त्याची पोलीस कोठडी संपत असल्याने खंडणी प्रकरणात अजून किती तक्रारदार पुढे येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत देवरेविरूध्द पाच गुन्हे दाखल झाले आहेत.

देवरे हा राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता असून राजकीय वर्तुळात त्याचा सहज वावर राहिला आहे. राष्ट्रवादीच्या माजी आमदारांचा त्याच्यावर वरदहस्त कायम राहिला आहे. राजकीय पाठबळामुळे त्याची गुंड प्रवृत्ती जोपासली गेली. कार्यकर्ता म्हणून वावर असलेला वैभव हा खासगी सावकारी करत होता. व्याजाने पैसे देणे, ते वसुलीसाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करण्यात त्याचा हातखंडा राहिला. विजय खानकरी यांच्या तक्रारीने त्याचे बिंग फुटले. १२ लाखांची खंडणी देवरे याने मागितली होती.

आणखी वाचा-नाशिक : काळाराम मंदिरात राजकीय नेत्यांची लगबग

इंदिरानगर पोलिसांनी या प्रकरणात अटक केल्यानंतर आतापर्यंत पाच गुन्हे त्याच्यावर नोंदवले गेले आहेत. यात भाजपचे पदाधिकारी जगन्नाथ पाटील यांचाही समावेश आहे. नोकरदार असलेले तीन जण पुढे आले. जगन पाटील यांनी देवरेकडून २० लाख रुपये व्याजाने घेतले. त्यासाठी व्याजदरही ठरला. मात्र व्याजाची रक्कम देतांना तारीख चुकल्याने त्यांच्याकडून १० लाखाऐवजी २० लाख घेतले. वसुलीसाठी त्याने जगन पाटील यांचे घर, कार्यालय, वडिलोपार्जित जमीन अशी वेगवेगळी मालमत्ता स्वत:च्या नावावर करून घेतली.

या काळात पाटील यांच्याकडील वाहने, अशी मालमत्ता त्याने स्वत:च्या तसेच पत्नी सोनाली, अन्य काही लोकांच्या नावावर करून घेतली आहे. पैसे वसुलीसाठी त्याने पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली. २०१५ पासून हा प्रकार सुरू होता. शिवीगाळ तसेच मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे. आतापर्यंत तीन कोटीची रक्कम खंडणीसाठी उकळली. एका तक्रारदारांच्या पत्नीने देवरे याने शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार केली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five cases filed against extortionist vaibhav deore three crore extortion from bjp office bearer mrj