नाशिक – नाशिकहून २८ ऑक्टोबरपासून जयपूर आणि हैदराबादसाठी विमानसेवा पूर्ववत सुरू होणार असतानाच आता देशाची राजधानी दिल्लीसाठीही नाशिकहून दिवसातून दोनवेळा विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे एका दिवसात दिल्लीतील कार्यक्रम उरकून नाशिकमध्ये परत येणे व्यापारी, व्यावसायिक यांना शक्य होणार आहे. नाशिक हळूहळू देशातील सर्वच प्रमुख शहरांशी विमानसेवेने जोडले जाणार आहे.
नाशिक शहरापासून जानोरीजवळ विमानतळ आहे. या विमानतळाचे अंतर नाशिकपासून सुमारे २० किलोमीटर आहे. या विमानतळावरून सध्या इंडिगो कंपनीची सेवा सुरू असून, नवी दिल्ली, हैदराबाद, गोवा, नागपूर, बेंगळुरू, अहमदाबाद आदी ठिकाणांसाठी ही विमानसेवा आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक-इंदूर-जयपूर विमानसेवा खंडित झाली होती. त्यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे पर्यटनासाठी जाणाऱ्यांची गैरसोय झाली होती. परंतु, आता इंडिगो कंपनीच्या वतीने २८ ऑक्टोबरपासून नाशिक-इंदूर-जयपूर आणि नाशिक-हैदराबाद अतिरिक्त विमान सुरू करण्यात येणार आहे.
जयपूर-इंदूर-नाशिक विमानाने जयपूर येथून सकाळी ११.४५ वाजता उड्डाण घेतल्यावर ते दुपारी १.१० वाजता इंदूरला पोहोचेल. तेथून २० मिनिटांच्या अंतराने १.३० वाजता नाशिककडे प्रस्थान करणार. नाशिक येथे २.४० वाजता उतरेल. हेच विमान दुपारी तीन वाजता नाशिक विमानतळावरुन जयपूरसाठी उड्डाण भरेल. दुपारी ४.१५ वाजता इंदूरला पोहोचेल. तेथून ४.३५ वाजता निघाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता जयपूरला उतरेल. हैदराबादसाठी असलेले विमान हैदराबाद येथून सकाळी ६.५० वाजता निघेल. आणि ८.४० वाजता नाशिकला पोहोचेल. हेच विमान नाशिकहून सकाळी नऊ वाजता निघून १०.४५ वाजता हैदराबादकडे निघू शकेल.
नवी दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम १५ जूनपासून सुरू करण्यात आल्याने नाशिक-नवी दिल्ली विमानसेवा रोजऐवजी आठवड्यातून तीनच दिवसांवर मर्यादित करण्यात आली होती. आता धावपट्टीचे काम पूर्ण झाल्याने इंडिगोने २६ ऑक्टोबरपासून दिल्लीसाठी दररोज दोन वेळा विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. १८० आसनांचे हे विमान असेल. उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी प्रामुख्याने या विमानसेवेचा लाभ होणार आहे. नाशिकमध्ये विविध पर्यटन कंपन्या कार्यरत आहेत. उत्तर भारतातील पर्यटन स्थळी जाण्यासाठी पर्यटन कंपन्यांना नाशिकहून थेट दिल्ली विमानसेवा फायदेशीर पडणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरळीत राहण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्यात उत्तर भारतातून नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसाठी या विमानसेवेचा लाभ होणार आहे.