नाशिक : नाशिकरोडजवळील चाडेगाव शेतमळा परिसरात सातत्याने दिसणारा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. चेहडी येथील माजी नगरसेवक पंडित आवारे यांच्या शेतात शनिवारी वनविभागाच्या पथकाने लावलेल्या पिंजऱ्यात तीन वर्षाची बिबट्या मादी अडकली.मागील आठवड्यात शेतात काम करत असतांना भारत आवारे यांना बिबट्या दिसला होता. त्यानंतर परिसरात अनेक वेळा बिबट्या दिसत होता. त्याच्या डरकाळ्यांमुळे शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण होते. आवारे यांनी वनविभागाशी संपर्क साधून बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी केली.

शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने शेतात पिंजरा लावत बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अखेर शनिवारी सकाळी तीन वर्षाची मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकली. बिबट्याला सुरक्षितपणे वनविभागाचे अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने म्हसरूळ येथील वन्यजीव उपचार केंद्र येथे हलविले. परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तथापि, वनविभागाच्या माहितीनुसार या भागात अजूनही काही बिबटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी वडनेरे, आर्टिलरी सेंटर, पिंपळगाव आदी भागात सात ते आठ बिबटे वनविभागाने जेरबंद केले आहेत.

शहर परिसरात बिबट्याचा सुळसुळाट वाढला आहे. मागील काही महिन्यात बिबट्याने येथील नागरीकांवर तसेच बालकांवर हल्ला केला. पाथर्डी परिसरात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बिबट्याच्या हल्लात सात वर्षीय आयुष भगत या बालकाचा मृत्यू झाला. तसेच आर्टिलरी सेंटर परिसरात कर्मचारी वसाहत मध्ये श्रृतीक या दोन वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला. या हल्लात त्याचा मृत्यू झाला. या घटनांमुळे भयभीत झालेल्या नागरीकांनी वनविभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे करत दोन वेळा आंदोलन केले.

बिबट्याला जेरबंद करा अन्यथा वनमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा, तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. विशेष म्हणजे इशारा दिल्यानंतर अवघ्या २४ तासात बिबट्या जेरबंद करण्यात यश आले. वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब, देवळाली कॅम्प परिसरात या ठिकाणी बिबट्या आढळला. वनविभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावले. ड्रोनच्या माध्यमातूनही बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. वन विभागाच्या या प्रयत्नांना यश आले. आत्ता पर्यंत बिबट्याचा वावर असलेल्या या भागातून आठ बिबटे जेरबंद करत त्यांना म्हसरूळ येथील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. उपचारा नंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल. मात्र बिबट्या जेरबंद करतांना अपुरे मनुष्यबळासह अन्य तांत्रिक अडचणींचा सामना वनविभागाला करावा लागत आहे.