नाशिक – कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्था स्थापन करताना न्यासाच्या उद्देश पूर्तीसाठी कार्य करता यावे म्हणून विश्वस्त मंडळाला सर्वाधिकार दिले गेले. कुठल्याही विश्वस्ताची मुदत १० वर्षांपेक्षा अधिक असणार नाही, असाही मूळ घटनेत उल्लेख आहे. त्यामध्ये सल्लागार असे कोणतेही पद नसताना सद्यस्थितीत संस्थेत चार व्यक्ती या पदावर कार्यरत असल्याचे दिसते.

कार्यवाह सुरेश भटेवरा यांच्या राजीनाम्यामुळे प्रतिष्ठानचा कारभार चर्चेत आला आहे. प्रतिष्ठानमध्ये संबंधितांना सल्लागार करताना संस्थेने घटनेत दुरुस्ती केली की, घटना बाजुला ठेवत नियुक्ती केली, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत डहाके यांनी या संदर्भात माहिती घेऊन भाष्य करणे योग्य ठरेल, असे नमूद केले.

तीन नवीन विश्वस्त निवड प्रक्रियेतील घटनाक्रमातून कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा कारभार एकचालकानुवर्ती बनल्याची भावना प्रबळ झाली आहे. एक सल्लागार आणि दोन विश्वस्तांच्या विरोधामुळे अंतिम टप्प्यातील प्रक्रियेला खीळ बसली. या प्रक्रियेवर अविश्वास दाखविला गेल्याने कार्यवाह सुरेश भटेवरा हे राजीनामा देऊन बाहेर पडल्याचे बोलले जाते. प्रतिष्ठानच्या कारभारावर विश्वस्त मंडळांऐवजी सल्लागारांचा प्रभाव असून तेच ही संस्था चालवत असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात होत आहे.

जानेवारी १९९० मध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक हा न्यास स्थापन झाला. कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर यांना अभिप्रेत सांस्कृतिक व सामाजिक कार्य करण्यासाठी संस्थेत किमान ११ किंवा कमाल १५ सदस्यांचे विश्वस्त मंडळ असेल ,असे मूळ घटनेत नमूद आहे. निवृत्त विश्वस्तही फेरनिवडीस पात्र राहतील, मात्र अशा कोणत्याही विश्वस्तांची मुदत १० वर्षांपेक्षा अधिक असणार नाही, असे म्हटले आहे.

न्यासाच्या उ्द्देशपूर्तीसाठी विश्वस्त मंडळात सर्वाधिकारी असतील असे नमूद आहे. घटनेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, खजिनदार या पदांचा उल्लेख आहे. परंतु, सल्लागार या पदाचा कुठेही उल्लेख नाही. संस्थेचे माजी कार्यवाह सध्या सल्लागार झाले असून एकाच वेळी चार सल्लागार संस्थेत कार्यरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. घटना दुरुस्तीने ही पदे निर्माण झाली की नाही, याबद्दल अस्पष्टता आहे.

संस्थेच्या घटनेत सल्लागार हे पद आहे की नाही, यावर आंपणास माहिती घ्यावी लागेल. त्यामुळे आता त्यावर बोलणे योग्य नाही. कार्यवाह सुरेश भटेवरा यांचा राजीनामा, नवीन विश्वस्तांची निवड या सध्याच्या विषयांवर लवकरच म्हणजे दिवाळीनंतर बैठक घेऊन सर्व प्रश्नांचा उहापोह केला जाईल. – वसंत आबाजी डहाके (अध्यक्ष, कुसुमाग्रज प्रतिष्ठान)