जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दसऱ्यानंतर सातत्याने दरवाढ सुरू असल्याने सोने दररोज नवीन उच्चांक करत आहे. बुधवारी देखील आदल्या दिवसाचा उच्चांक मोडीत काढून सोन्याने पुन्हा नवा उच्चांक केला. सोन्याच्या दरातील भूकंपाचा बाजारपेठेला चांगलाच हादरा बसला.
सणासुदीचा काळ सुरू होताच सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असताना, दिवाळी जवळ येत असल्याने वाढत्या दरांमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. बुधवारी पुन्हा एकदा सोन्यात मोठी दरवाढ नोंदवली गेल्यानंतर स्थानिक बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर सव्वालाख रूपयांच्या पुढे गेला. देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून वाढती खरेदी आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याच्या किंमतींना आणखी चालना मिळाली आहे. याशिवाय, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी वाढली आहे.
सण-उत्सवासह लग्न सराईचे वेध लागल्याने खरेदीत वाढ झाली असली, तरी ग्राहकांना सोने खरेदीचे नियोजन करताना अतिरिक्त खर्चाचा विचार करावा लागत आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेसह देशांतर्गत मागणीमुळे सोन्याच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीने प्रति औंस ४,००० डॉलर्सचा टप्पा ओलांडला. इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या किमतींनी हा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता कॉमेक्सवर देखील सोन्याच्या वायद्यांचा भाव प्रति औंस ४,०४० डॉलर्स होता. आंतरराष्ट्रीय बाजारात यू. एस. ट्रेझरी बाँडवरील उत्पन्न दरात घसरण झाल्यामुळेही सोन्याला आधार मिळाला आहे. गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसा काढून सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे, असे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी सांगितले.
जळगाव शहरातही सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २३ हजार ८०६ रुपयांच्या उच्चांकावर होते. मंगळवारी दिवसभरात पुन्हा ७२१ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने जीएसटीसह एक लाख २४ हजार ५२७ रुपयांचा नवीन उच्चांक केला. बुधवारी सकाळी बाजार उघडल्यावर पुन्हा १४४२ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २५ हजार ९६९ रूपयांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.
चांदीचे दर स्थिर
शहरात सोमवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५५ हजार ५३० रूपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. मंगळवारी दिवसभरात १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेल्यानंतर चांदीने एक लाख ५६ हजार ५६० रूपयांचा नवीन उच्चांक केला. बुधवारी सकाळी दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आली नाही. परिणामी, चांदीचे दर स्थिर राहिले.