जळगाव – शहरातील सराफ बाजारात उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या सोने दरात सलग पाच दिवसांपासून घसरण सुरू होती. त्यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांना काहीअंशी दिलासा मिळालेला असताना, बुधवारी सोने दरात मंगळवारच्या तुलनेत सुमारे १२३६ रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. परिणामी, सोने जीएसटीसह प्रतितोळा ९२ हजार ७०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगावमध्ये गुढीपाडव्यानंतर सोन्याचे दर उच्चांकी ९४ हजार ३४८ रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर सोने दराची पडझड सुरू झाली, ती मंगळवारपर्यंत कायम राहिली. सोन्याचे दर तब्बल २८८४ रुपयांनी घसरल्याने सराफ बाजारात त्यामुळे थोडेफार चैतन्य निर्माण झाले होते. घसरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास सोन्याचे दर आवाक्यात येतील, अशी आशा ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना होती. मात्र, बुधवारी सोने दराने अचानक उसळी घेतल्याचा अनुभव आल्याने सर्वांना धक्का बसला. मंगळवारी सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९१ हजार ४६४ रुपये होते. बुधवारी सुमारे १२३६ रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर प्रतितोळा ९२ हजारांवर पोहोचले. गेल्या पाच दिवसात जेवढे काही सोन्याचे दर कमी झाले होते, त्याच्या ४५ टक्के दर एकाच दिवसात वाढल्याने सर्वांचा भ्रमनिरास झाला.

चांदीतही तेजीचे चित्र कायम जळगावमध्ये दोनच दिवसात तब्बल ९२७० रुपयांची घट झाल्यानंतर शनिवारी चांदी प्रतिकिलो ९२ हजार ७०० रुपयांपर्यंत खाली आली होती. मात्र, नंतरच्या काळात कमी-अधिक फरकाने सातत्याने दरात वाढ होत राहिल्याने मंगळवारी चांदी पुन्हा ९३ हजारांवर गेली होती. बुधवारी देखील ५१५ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्यानंतर चांदी प्रतिकिलो ९४ हजार २४५ रुपयांपर्यंत पोहोचली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold price increases by rs 1236 in jalgaon amy