जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर गुरूवारी सोन्याच्या दरात किंचित घट नोंदवली गेली, तर चांदीचे दर स्थिर राहिले. शुक्रवारी देखील दोन्ही धातुंच्या दरात बदल नोंदवले गेले.

अमेरिकन मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्यानंतर सुवर्ण बाजारात मोठ्या चढ-उतारांची नोंद झाली आहे. फेडच्या निर्णयानंतर सुरुवातीला सोन्याच्या किमतींमध्ये वाढ दिसून आली होती, मात्र आता पुन्हा एकदा घसरणीची लाट सुरू झाली आहे. दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमती सातत्याने वाढत होत्या. परंतु, दिवाळीनंतर बाजारात काहीसे शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. फेडच्या दर कपातीमुळे सोन्यातील घसरण रोखली गेली आहे. त्यामुळे शुक्रवारी बऱ्याच दिवसांच्या कालखंडानंतर पहिल्यांदा सोन्याचे दर स्थिर असल्याचे दिसून आले. तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांची बदलती धोरणे यांचा सोन्याच्या दरावर थेट परिणाम होत आहे. येत्या काही दिवसांत फेडच्या पुढील भूमिकेनुसार आणि डॉलरच्या स्थितीनुसार सोन्याच्या किमतींमध्ये आणखी मोठे चढ-उतार पाहायला मिळू शकतात.

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतींनी विक्रमी पातळी गाठली होती. २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३५ हजार रुपये इतका झाला होता. दिवाळीच्या काळात दरात चढ-उतार झाले असले तरी सोन्याने आपला दबदबा कायम राखला. दिवाळीनंतर मात्र सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने घट होत असून, आजतागायत ही घसरण कमी-अधिक फरकाने सुरूच आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली आणि डॉलरच्या दरातील बदल यामुळे आगामी काही दिवसांपर्यंत हा कल कायम राहू शकतो.

शहरात गुरूवारी सोने जीएसटीसह एक लाख २४ हजार ४२४ रूपयांवर स्थिरावले होते. शुक्रवारी सकाळी बाजार उघडल्यावर गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पहिल्यांदा सोन्याच्या दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदवली गेली नाही. त्यामुळे सोन्याचे दर एक लाख २४ हजार ४२४ रूपयांवर स्थिर राहिले.

चांदीत १०३० रूपयांची वाढ

शहरात बुधवारी ५१५० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५४ हजार ५०० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचली होती. गुरूवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा २००० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५२ हजार ४४० रूपयांपर्यंत घसरली. परंतु, दुपारनंतर जेवढे दर घटले होते तेवढे पुन्हा वाढल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५४ हजार ५०० रूपयांवर स्थिरावली. अर्थात, शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदी एक लाख ५५ हजार ५३० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचली.