जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मोठे, मध्यम तसेच लघू प्रकल्प तुडूंब भरले आहेत. पाटबंधारे विभागाकडून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी काही प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आल्याने नद्यांना पूर आले आहेत. काठावरील गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या हतनूर, गिरणा आणि वाघूर, या सिंचन प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १०२७.१० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. प्रत्यक्षात, १६ सप्टेंबरअखेर तिन्ही प्रकल्पांत ९२९ दशलक्ष घनमीटर (९०.४६ टक्के) साठा निर्माण झाला आहे. पैकी हतनूरमध्ये ६६.९० टक्के साठा झाला असून, बुधवारी सकाळी नऊ वाजता या धरणाचे चार दरवाजे पूर्णपणे आणि १२ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले. ज्या कारणाने ८५ हजार ७१० क्यूसेकने विसर्ग सुरू होता.

याशिवाय, उजव्या कालव्याद्वारे २०० क्यूसेकने विसर्ग सुरू होता. जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर प्रकल्पातही ९६.३७ टक्के पाणी साठा झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा मंगळवारी या धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र, आवक कमी झाल्यानंतर बुधवारी सकाळी फक्त चार दरवाजे ०.२५ मीटरने उघडे ठेवून उर्वरित दरवाजे बंद करण्यात आले. ज्यामुळे हतनूरच्या सांडव्यातून ३२९३ क्सूसेकने आणि डाव्या कालव्यातून ७७ क्यूसेकने विसर्ग सुरू होता.

नाशिक आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील गिरणा धरणातही १०० टक्के पाणी साठा निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी या धरणाचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने नदीला पूर आला होता. मात्र, पाण्याची आवक कमी झाल्यानंतर धरणाचा एकच दरवाजा आता ०.३० मीटरने उघडा ठेवण्यात आला आहे. त्या माध्यमातून बुधवारी सकाळी १२३८ क्यूसेकने विसर्ग सुरू होता. दुसरीकडे, हतनूरचा विसर्ग वाढल्यानंतर तापीवर असलेल्या शेळगाव बॅरेजचे १४ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. परिणामी, ८२ हजार ८८१ क्सूसेकने विसर्ग सुरू आहे.

मध्यम प्रकल्पांतूनही विसर्ग

जिल्ह्यात सर्व मध्यम प्रकल्पांची एकूण पाणी साठा क्षमता ३१४.२५ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. प्रत्यक्षात, १६ सप्टेंबरअखेर सर्व प्रकल्पांत २१० दशलक्ष घनमीटर (६७ टक्के) पाणी साठा निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. पैकी अभोरा, मंगरूळ, सुकी, हिवरा, तोंडापूर, अंजनी, बोरी आणि मन्याड हे सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तसेच बरेच प्रकल्प ९० टक्क्यांच्या पुढे आहेत. बुधवारी सकाळी मोर प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.०२ मीटरने, बहुळा प्रकल्पाचे तीन दरवाजे ०.०१ मीटरने, अंजनीचा एक दरवाजा ०.०१ मीटरने आणि दोन दरवाजे ०.०२ मीटरने, बोरी प्रकल्पाचा एक दरवाजा ०.१५ मीटरने उघडण्यात आल्याचे दिसून आले.