नाशिक – जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीचा महावितरण कंपनीला मोठा तडाखा बसला. उच्च व लघू दाबाचे तब्बल ६४० खांब जमीनदोस्त झाले. ६३ उच्च दाब व लघूदाबाच्या तारा तुटल्या. ५३ रोहित्र नादुरुस्त झाले. या विविध कारणांनी महावितरणच्या यंत्रणेचे एक कोटीहून अधिकचे नुकसान झाले. वादळी पावसाने ओढावलेल्या संकटात अनेक भागात वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले.

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडवली. अतिवृष्टीने १५ तालुक्यांमध्ये शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेकडो घरांची पडझड झाली. बागलाण तालुक्यात भिंत कोसळून तिघांना जीव गमवावा लागला. या काळात धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यामुळे नद्यांना पूर आला होता, एकाच दिवसांत ११७ पैकी ९८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. जवळपास संपूर्ण जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा सहन करावा लागला होता.

पावसाची झळ महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेलाही बसली. सप्टेंबर महिन्यात पावसामुळे महावितरणची वीज वितरण प्रणाली व उपकरणांच्या नुकसानीचा अहवाल प्रशासनास सादर करण्यात आला आहे. त्यानुसार उच्चदाब वाहिन्यांचे २०२ खांब जमीनदोस्त झाले. तर पावसात पडलेल्या लघूदाब वाहिन्यांच्या खांबांची संख्या ४३८ इतकी आहे. खांब पडून ५४ लाख रुपयांचे नुकसान झाले. वादळी पावसात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. खांब व फांद्या पडल्याने या काळात उच्च दाबाच्या २० आणि लघू दाबाच्या ४३ तारा तुटल्या. १२ लघूदाब रोहित्र एकतर पडले अथवा वाकले. ५३ रोहित्र नादरुस्त झाले. उपकेंद्रातील सात उपकरणे नादुरुस्त झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

पावसामुळे महावितरणचे एक कोटी दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. तो पूर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना धडपड करावी लागली. शहरात झाडांच्या फांद्या पडल्याने वा वितरण यंत्रणेतील दोषामुळे विजेचा लपंडाव सुरू होता.

तालुकानिहाय वीज खांंबांचे नुकसान

बागलाण व नांदगाव भागात महावितरणचे सर्वाधिक आर्थिक नुकसान झाले. नांदगाव तालुक्यात (१०२ खांब), बागलाण तालुक्यात (५७ खांब), येवला (५८), त्र्यंबकेश्वर (४३ खांब), मालेगाव (४४), पेठ (४३), चांदवड (७१), निफाड (८५), सिन्नर (३५), दिंडोरी (२६),सुरगाणा (२९). इगतपुरी (२६), नाशिक तालुका (पाच) असे लघू व उच्च दाब वीज खांबांचे नुकसान झाले.